नांगर धरण्याची ताकद ज्याच्या मनगटात, त्यालाच अध्यक्ष करू
By Admin | Updated: January 28, 2017 00:51 IST2017-01-28T00:50:38+5:302017-01-28T00:51:54+5:30
पानगाव : ज्याच्या मनगटात मातीत नांगर धरण्याची ताकद आहे, असा अध्यक्ष जि.प.चा केला जाईल, असे मत पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी येथे केले

नांगर धरण्याची ताकद ज्याच्या मनगटात, त्यालाच अध्यक्ष करू
पानगाव : वातानुकूलित वातावरणात वावरणारा व वातानुकूलित गाड्यांमध्ये फिरणारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार नाही. तर तळागाळातून, सर्वसामान्य माणसांतून पुढे आलेला सामान्य कार्यकर्ता, ज्याला की प्रश्नांची जाण आहे. ज्याच्या मनगटात मातीत नांगर धरण्याची ताकद आहे, असा अध्यक्ष जि.प.चा केला जाईल, असे मत पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी येथे केले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने रेणापूर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा गुरुवारी पानगाव येथे झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे होते. मंचावर आमदार विनायकराव पाटील, रमेश कराड, माजी आ. गोविंद केंद्रे, विजय क्षीरसागर, ओमप्रकाश गोडभरले, ‘पन्नगेश्वर’चे उपाध्यक्ष किशन भंडारे, काशीराम पाटील, राजकुमार मजगे, अमोल पाटील, विक्रम शिंदे, गोविंद नरहरे, तात्याराव बेद्रे, भागवत सोट, विजय काळे, निलंग्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, जि.प. सदस्य रामचंद्र तिरुके, व्यंकट अनामे, मंजुषा कुटवाड, ललिता कांबळे, शालिनी कराड, सुरेश लहाने, भाऊसाहेब हाके-पाटील, नवनाथ भोसले, वसंत दहिफळे, श्रीकिशन जाधव, पृथ्वीसिंह बायस, दिलीप धोत्रे, सुकेशिनी भंडारे, गंगासिंह कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री संभाजीराव पाटील म्हणाले, गेल्या ६० वर्षांपासून काँग्रेस देशात व राज्यात सत्तेत होती. त्यांनी काहीच केले नाही. किमान लातूरच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था काँग्रेसला करता आली नाही. त्यामुळेच काँग्रेसला सध्या अनेक ठिकाणी उमेदवारही मिळत नाहीत. जिल्ह्यात लातूर, लातूर ग्रामीण, रेणापूर, औसा व निलंगा हे काँग्रेसचे बुरुज आहेत. त्यापैकी निलंग्याचा बुरुज मी उखडून फेकला आहे. इतर बुरुजं आपल्याला संपवायचे आहेत. येत्या निवडणुकीत निलंग्यात काँग्रेसचे खातेही उघडू देणार नाही. (वार्ताहर)