खरंच कुणी कापली वेणी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:01 IST2017-08-30T01:01:24+5:302017-08-30T01:01:24+5:30

मागील पंधरा दिवसांत शहरात तीन ठिकाणी महिला आणि मुलींचे केस कापण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे

 Who really is a bunny braid? | खरंच कुणी कापली वेणी ?

खरंच कुणी कापली वेणी ?

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मागील पंधरा दिवसांत शहरात तीन ठिकाणी महिला आणि मुलींचे केस कापण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे. काही घरांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण आहे. भर बाजारपेठेत एखाद्या महिलेची वेणी कापली जाऊ शकते का, एखाद्या ठिकाणी माणसांची वर्दळ असलेल्या घरांत एखाद्या मुलीचे केस कापले जाऊ शकतात का, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. तीन घटनांमध्ये ज्या महिला आणि मुलींचे केस कापले गेले त्यामध्ये प्रामुख्याने केस मानेच्या बाजूने कापले गेल्याचे दिसले. केस कापले गेल्याचे वास्तव आहे. मात्र, हे केस कोणी कापले, हे या घटनेतील महिला आणि पोलिसांना सांगता आले नाही. ‘केस कोणी कापले हे आम्हाला माहीत नाही,’ असेच उत्तर या महिला आणि मुलींनी ‘लोकमत’शी बोलताना दिले. या सर्व प्रकारामुळे पोलीसही चक्रावले आहेत. केस कापल्याच्या घटनेमागे नेमके कोण असावे, काय कारण असावे, पोलीस, मानसशास्त्रज्ञ आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते याबाबत काय म्हणतात, यासंबंधी घेतलेला हा आढावा.
कुटुंबाच्या सहकार्याने कारण शोधता येईल : अविनाश पाटील
मुलींच्या वेण्या कापण्याचे प्रकार वाढत आहेत; पण त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. संबंधित मुलीने, तिच्या कुटुंबियांनी व प्रशासनाने जर सहकार्य केले, तर महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समिती या घटनांमागील कारण नक्की शोधून काढेल, असा विश्वास या समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केला.
यासंदर्भात त्यांनी सांगितले की, या अशा घटनांमुळे भीती नको, घाबरून जाऊ नये. या अशा भयग्रस्त घटनांची लागण होऊन मालिका तयार होते. या मागचे कार्यकारणभाव शोधता येते; पण त्यासाठी संबंधित मुलीने, कुटुंबाने व प्रशासनाने सहकार्य देण्याची गरज आहे. या घटनांना चमत्कार किंवा अद्भुत घडतंय असं म्हणून अधिक हवा दिली जाते. अतिरंजित वर्णन केले जाते. या मागचे कारण शोधून समुपदेशन करता येऊ शकते.
आत्मा आपोआप काही तरी घडवतो ही समजूत : शाम मानव
वेणी कापण्याचा प्रकार हा भानामतीचा (पोल्टेरसीस्ट फेनोमेना) प्रकार समजला जातो. आत्मा आपोआप काही तरी घडवीत असतो, अशी यात समजूत असते आणि याची एक दहशत असते. आत्माच इकडची भांडी तिकडे करतो, अन्नात विष्ठा मिसळवतो, वेणी कापतो, अशा समजुती विदर्भ, मराठवाडा आणि हिंदी भाषक प्रदेशांमध्ये अधिक रूढ आहेत; पण अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अशी शंभर प्रकरणे हाताळली.
तेव्हा त्या सर्वांची उत्तरे मिळालेली आहेत, असे ठामपणे या समितीचे नेते श्याम मानव यांनी सांगितले.
ते म्हणाले, ब्लेड, कैची, चाकू याशिवाय वेणी कापता येऊ शकत नाही. किड्या-मुंग्यांचे हे काम नाही, तर माणूसच हे काम करू शकतो. मी १९८७ साली ‘शोध भानामतीचा’ हे पुस्तक लिहिले आहे. हवा तर पोलिसांनी या पुस्तकाच्या आधारे आपला तपास सुरू करावा, वेणी कापण्याचे कारण नक्की समजल्याशिवाय राहणार नाही.

Web Title:  Who really is a bunny braid?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.