२५ लाखांच्या गुटख्याचा मालक कोण?

By | Updated: November 28, 2020 04:11 IST2020-11-28T04:11:44+5:302020-11-28T04:11:44+5:30

राज्यात गुटखा बंदी आहे. मात्र, मराठवाड्याची राजधानी असलेले औरंगाबाद शहर याला अपवाद आहे. शहरातील प्रत्येक चौक आणि रस्त्यावरील टपरी ...

Who owns 25 lakh gutkhas? | २५ लाखांच्या गुटख्याचा मालक कोण?

२५ लाखांच्या गुटख्याचा मालक कोण?

राज्यात गुटखा बंदी आहे. मात्र, मराठवाड्याची राजधानी असलेले औरंगाबाद शहर याला अपवाद आहे. शहरातील प्रत्येक चौक आणि रस्त्यावरील टपरी आणि दुकानांत गुटखा हमखास मिळतो. यामुळे शहरात गुटख्याला मागणी असल्याने पुरवठाही जोरकसपणे सुरू असल्याचे दिसून येते. आठ दिवसांपूर्वी आसेगाव रस्त्यावर पोलीस आयुक्तांच्या पथकाने गुटख्याचा टेम्पो पकडला. या कारवाईनंतर गुन्हे शाखेने शुक्रवारी बॅटको रोडलाईन ट्रान्सपोर्टवर धाड टाकून सुमारे २५ लाखांचा गुटखा जप्त केला. ट्रान्सपोर्टचा व्यवस्थापक हनीफ अब्दुल रहेमान पटनी (४३, रा. टाईम्स कॉलनी) याला अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी त्याच्याकडे गुटख्याचा मालक कोण आहे, गुटखा कोणी पाठवला आणि त्याची डिलिव्हरी कोणाला करणार होता आणि माल मागवणाऱ्याचा पत्ता काय, अशा प्रश्नांची सरबत्ती केली. गुरुवारी सकाळी इंदूरहून आलेला सुमारे ९ लाखांचा गुटखा नदीम शेखचा असल्याचे त्याने सांगितले. उर्वरित गुटख्याविषयी त्याने तोंड उघडले नाही. उलट उडवाउडवीची उत्तरे पटनीने पोलीस अधिकाऱ्याना दिल्याचे सूत्राने सांगितले.

चौकट

९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी शुक्रवारी व्यवस्थापक पटनीला न्यायालयात हजर केले. तेव्हा आरोपीच्या वकिलांनी त्याच्या पोलीस कोठडीला विरोध केला असता पोलीस निरीक्षक केंद्रे यांनी स्वतः न्यायालयात बाजू मांडली. नदीम शेखला अटक करायची असल्याने त्यास पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. पोलिसांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने त्याला दोन दिवस कोठडी ठोठावली.

=========

नदीम शेख फरार

इंदूरहून गुटखा आणणारा नदीम शेख पोलिसांची धाड पडल्यापासून फरार झाला आहे. सूत्राने सांगितले की, नदीम हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुटखा विक्रेता आहे. त्याला यापूर्वी जिन्सी पोलिसांनी अटक केली होती.

Web Title: Who owns 25 lakh gutkhas?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.