कृत्रीम पावसाचे विमान गेले कुणीकडे?
By Admin | Updated: August 22, 2015 23:57 IST2015-08-22T23:52:18+5:302015-08-22T23:57:44+5:30
उस्मानाबाद : नाशिक जिल्ह्यातील प्रयोगानंतर मराठवाड्यात कृत्रीम पाऊस पाडण्याचा प्रयोग सुरु करण्यात आला होता. मात्र मागील १५ दिवसांपासून हे विमान दुष्काळी

कृत्रीम पावसाचे विमान गेले कुणीकडे?
उस्मानाबाद : नाशिक जिल्ह्यातील प्रयोगानंतर मराठवाड्यात कृत्रीम पाऊस पाडण्याचा प्रयोग सुरु करण्यात आला होता. मात्र मागील १५ दिवसांपासून हे विमान दुष्काळी उस्मानाबाद जिल्ह्याकडे फिरकलेले नसल्याने कृत्रीम पावसाचे विमान गेले कुणीकडे असा प्रश्न नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबादसह तुळजापूर, भूम आणि परंडा तालुक्यातील काही भागात ५ आॅगस्ट रोजी कृत्रीम पाऊस पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र विमानाद्वारे ढगावर रासायनिक फवारणी करुनही दाट ढग नसल्याने या पहिल्या प्रयत्नाला फारसे यश मिळाले नव्हते. त्याचवेळी पुढील दोन महिने मराठवाड्यात कृत्रीम पावसाचा प्रयोग करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी जाहीर केले होते. मात्र पहिला प्रयत्न करुन १५ दिवस उलटले तरी कृत्रीम पावसाचे विमान जिल्ह्याकडे फिरकलेले नसल्याने हा प्रयोग सुरु आहे की नाही? याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास परंडा तालुक्यातील काही भागात विमान फिरल्याची चर्चा होती. हा प्रयत्न वगळता मागील पंधरा दिवसात विमानाने उस्मानाबाद जिल्ह्याला दर्शन दिलेले नाही. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असतानाही कृत्रीम पावसाचा हा प्रयोग का थांबविण्यात आला. अशी विचारणा आता नागरिकांतून होत आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील कुठल्याही भागात फारसा पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. कृत्रीम पावसाचा प्रयोग राबविण्याची मागणी होत आहे.