पांढऱ्या सोन्याला अखेर झळाळी
By Admin | Updated: December 24, 2015 00:03 IST2015-12-23T23:51:57+5:302015-12-24T00:03:05+5:30
शेंद्रा : सरकीच्या दरात तेजी आल्याने गेल्या आठवड्यापासून कापसाच्या दरात दरवाढ होत असून, बुधवारी कापसाचा दर ४७०० रुपये झाला.

पांढऱ्या सोन्याला अखेर झळाळी
शेंद्रा : सरकीच्या दरात तेजी आल्याने गेल्या आठवड्यापासून कापसाच्या दरात दरवाढ होत असून, बुधवारी कापसाचा दर ४७०० रुपये झाला. संभाव्य दरवाढीचा वेध घेत तूर्त कापसाची आवक ठप्प झाली आहे.
यावर्षी सुरुवातीपासून कापसाचे दर चार हजार रुपयांच्या आतच होते. अनेक शेतकऱ्यांनी दर आणखी कमी होईल या भीतीमुळे कमी भावात का होईना कापसाची विक्री केली. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यातील मिळालेल्या दराने सरकारी दरापेक्षा खाजगी बाजाराने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
सध्याची परिस्थिती पाहता कापसाचा हा शेवटचा टप्पा आहे. यामुळे या दरवाढीचा फायदा जेमतेम शेतकऱ्यांनाच मिळणार आहे.
ज्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बरी होती, अशांनी आपला कापूस सांभाळून ठेवला होता.
एकतर यावर्षी उत्पन्नात झालेली मोठी घट व हंगामात मिळालेले कमी दर, यामुळे पिकावर झालेला खर्चही निघाला नाही. परंतु आता मिळालेली दरवाढ दुष्काळात संजीवनी ठरणारी आहे.
बाजारात झालेल्या दरवाढीचा फायदा लवकर शेतकऱ्यांना मिळत नाही. खाजगी व्यापारी बाजारातील दरवाढीची शेतकऱ्यांनाही लवकर माहिती देत नाहीत. मिळेल तोपर्यंत कमी भावाने खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु दर आणखी वाढण्याचे संकेत असल्याचे जाणकार सांगतात.
दरम्यान, संपूर्ण हंगामात कापसाच्या खाजगी बाजारपेठेचे दर शासकीय खरेदी दराच्या अवतीभवतीच फिरत असल्याने संभाव्य दरवाढीबाबत अनेकांचे गणित चुकले.
लागवड खर्च व उत्पन्नाची आवक पाहता पाच हजारांपेक्षा कमी दरात शेतकऱ्यांना कापूस देणे परवडणार नसल्याची अवस्था असताना अडलेल्या शेतकऱ्यांनी चार हजार रुपये दराने शासकीय खरेदी केंद्रावर कापूस दिला. आता कापसाची आवक मंदावली असताना सरकीच्या दरातही तेजी आली आहे.