विक्षिप्ताला बेदम चोप
By Admin | Updated: July 6, 2014 00:36 IST2014-07-06T00:33:43+5:302014-07-06T00:36:17+5:30
औरंगाबाद/ माळीवाडा : ‘तो’ कधी साडी, महिलांसारखा नट्टापट्टा करायचा, नथ घालायचा अन् कारमध्ये येऊन स्वत:च्या मुलीच्या वयाच्या शाळकरी मुलींना इशारे करायचा...

विक्षिप्ताला बेदम चोप
औरंगाबाद/ माळीवाडा : ‘तो’ कधी साडी, तर कधी पंजाबी ड्रेस परिधान करायचा, सोबतच महिलांसारखा नट्टापट्टा करायचा, नथ घालायचा अन् कारमध्ये येऊन स्वत:च्या मुलीच्या वयाच्या शाळकरी मुलींना इशारे करायचा... गेल्या दीड महिन्यापासून अशा पद्धतीने शाळकरी मुलींना त्रस्त करून सोडणाऱ्या विक्षिप्ताला शनिवारी शिंदी सिरसगावच्या गावकऱ्यांनी पाठलाग करून पकडून बेदम चोपले आणि कोंडून टाकले.
अभय प्रभाकर कुलकर्णी (३८, रा. जेल रोड, नाशिक, सध्या द्वारकानगरी, बजाजनगर), असे या विक्षिप्त व्यक्तीचे नाव आहे. तो वाळूज औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. त्याला वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.
घटनेबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी सांगितले की, गंगापूर तालुक्यातील शिंदी सिरसगाव येथे पाचवीपर्यंत शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी येथील मुले- मुली जवळच असलेल्या पोळ रांजणगावातील शाळेत जातात. मुली ज्या रस्त्याने पायी जातात त्या रस्त्यावर गेल्या दीड महिन्यापासून दर बुधवारी व शनिवारी आरोपी अभय कुलकर्णी कार घेऊन यायचा. कधी त्याने पंजाबी ड्रेस घातलेला असायचा, तर कधी साडी नेसलेली असायची.
कधी नाकात नथ घालून तो यायचा. त्याने महिलांप्रमाणे नट्टापट्टा केलेला असायचा.
या शाळकरी मुली दिसताच तो कार थांबवायचा. मुलींकडे पाहून अश्लील हातवारे करायचा. ‘चला कारमध्ये बसा, मी शाळेत सोडतो,’ असे म्हणायचा. हे नित्याचेच झाले होते.
पालकांनी रचला सापळा!
या विक्षिप्तपणामुळे शाळकरी मुलींमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. अखेर काही मुलींनी ही बाब आपल्या घरच्यांना सांगितली. :पाहता-पाहता अख्ख्या गावात ही वार्ता पोहोचली आणि मग गावकऱ्यांनी या विक्षिप्ताला धडा शिकवण्याचे ठरविले. शनिवारी तो हमखास येतो, हे गावकऱ्यांना मुलींकडून समजले होते. त्यामुळे मुली ज्या रस्त्याने जातात त्या रस्त्यावर गावकरी सकाळपासूनच दबा धरून बसले. मुलींना तो दिसताच इशारा करा आणि हातात दगड घेऊन त्याला मारा, असे सांगण्यात आले होते.
पाठलाग करून पकडले
नित्याप्रमाणे अभय आज सकाळी ८ वाजताच कार घेऊन महिलेचा ड्रेस घालून आला. त्याने मुलींची छेड काढणे सुरू करताच मुलींनी आरडाओरड करीत त्याच्यावर दगडफेक सुरू केली. इशारा मिळताच गावकऱ्यांनी अभयला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने सुसाट वेगाने कार शरणापूरच्या दिशेने घातली. अखेर शरणापूरजवळ त्याची कार बिघडली आणि तो संतप्त नागरिकांच्या हाती लागला.
मग गावकऱ्यांनी त्याला बेदम चोप देत गावात आणले व एका खोलीत कोंडले.
पोलिसांनी केली सुटका
घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी ठाण्याचा फौजफाटा शिंदी सिरसगावात पोहोचला. संतप्त गावकऱ्यांच्या तावडीतून पोलिसांनी अभय कुलकर्णीची सुटका केली आणि त्याला ठाण्यात आणण्यात आले. रात्री उशिरा अभयविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला व त्याला अटक करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक बहुरे यांनी सांगितले.
उच्चशिक्षित अन् चांगल्या पदावर कार्यरत
आरोपी अभय कुलकर्णी हा उच्चशिक्षित, सधन कुटुंबातील आहे. वाळूज एमआयडीसीतील एका मोठ्या कंपनीत तो व्यवस्थापक म्हणून कार्यरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याची पत्नी मुलांसह नाशिकला राहते. औरंगाबादेत तो एकटा ा राहतो आणि दर बुधवारी, शनिवारी नाशिकला ‘अप-डाऊन’ करतो. अप-डाऊन करतानाच तो हे उद्योग करीत असल्याचे समोर आले.
अभय मनोरुग्णच
असे कृत्य का करतोस, असे अटकेनंतर पोलिसांनी अभय कुलकर्णीला विचारले. तेव्हा चूक झाली, यापुढे करणार नाही, असे तो म्हणाला. त्याची एकंदरीत वागणूक पाहता तो मनोरुग्णच असल्याचे दिसून येतो. त्यामुळेच तर महिलांचे कपडे परिधान करून असा विक्षिप्तपणा तो करीत होता, असे पोलिसांनी सांगितले.
मुलींमध्ये दहशत
1महिलेच्या वेशात येऊन अभय कुलकर्णी दर बुधवारी आणि शनिवारी या शाळकरी मुलींची छेड काढीत होता. त्यांना त्रास देत असे.
2या प्रकाराने शाळकरी मुलींमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याच्या या कृत्यामुळे बुधवारी आणि शनिवारी काही मुली तर शाळेत जायला घाबरू लागल्या होत्या.