लाच घेताना पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला अटक

By Admin | Updated: March 1, 2015 00:09 IST2015-03-01T00:02:54+5:302015-03-01T00:09:37+5:30

औरंगाबाद : आठ दिवसांपासून आजारी असलेल्या बैलावर उपचार करण्यासाठी एका पशुधन विकास अधिकाऱ्याने शेतकऱ्याकडून दोन हजार रुपये लाच घेतली.

While taking a bribe, the veterinary officer was arrested | लाच घेताना पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला अटक

लाच घेताना पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला अटक


औरंगाबाद : आठ दिवसांपासून आजारी असलेल्या बैलावर उपचार करण्यासाठी एका पशुधन विकास अधिकाऱ्याने शेतकऱ्याकडून दोन हजार रुपये लाच घेतली. ही वैजापूर तालुक्यातील जानेफळ येथील तक्रारदाराच्या शेतवस्तीवर करण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली.
केशव भाऊराव निकाळजे (४८) असे अटक करण्यात आलेल्या पशुधन विकास अधिकाऱ्याचे नाव आहे. वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे ते कार्यरत आहेत.
जानेफळ येथील रहिवासी तक्रारदार शेतकऱ्याकडे दोन बैल, गाय, वासरं अशी जनावरे आहेत. त्यापैकी एक बैल सात ते आठ दिवसांपासून आजारी होता. त्यामुळे २५ फेब्रुवारी रोजी पशुविकास अधिकारी डॉ. केशव निकाळजे हे जानेफळ येथील शेतवस्तीवर गेले होते. तेथे त्यांनी बैलावर उपचार करण्यासाठी २ हजार १०० रुपये लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम २७ फेबु्रवारी रोजी घेऊन आल्यानंतर बैलावर उपचार करील, असे त्यांनी सांगितले. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या औरंगाबादेतील कार्यालयात येऊन तक्रार नोंदविली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन पंच तक्रारदारासोबत पाठवून लाचेच्या मागणीची पडताळणी केली. तेव्हाही निकाळजे यांनी लाचेची मागणी करून २८ रोजी दुपारी शेतवस्तीवर येणार असून, तेथे रक्कम देण्याचे सांगितले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, कर्मचारी कैलास कामठे, दत्ता तरटे, व्यंकट गंगुलवार, सुनील फेपाळे, दिनेश जाधव यांनी साध्या वेशात तेथे तकारदाराच्या शेतवस्तीवर सापळा रचला. त्यावेळी निकाळजे यांना तक्रारदाराकडून २ हजार रुपये लाच घेतल्यानंतर पकडण्यात आले. आरोपी विरोधात शिवूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: While taking a bribe, the veterinary officer was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.