घाईघाईने चौक पार करताना ट्रकने दुचाकीस्वार बालिकेला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:21 IST2021-02-05T04:21:11+5:302021-02-05T04:21:11+5:30
औरंगाबाद : बीड बायपासवरील गोदावरी टी पॉईंट वाहतूक सिग्नल पार करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीस्वार कुटुंबाला जोराची धडक दिली. या ...

घाईघाईने चौक पार करताना ट्रकने दुचाकीस्वार बालिकेला चिरडले
औरंगाबाद : बीड बायपासवरील गोदावरी टी पॉईंट वाहतूक सिग्नल पार करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीस्वार कुटुंबाला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात बालिका चाकाखाली चिरडून जागीच ठार झाली. तर तिचे आई वडील आणि मोठी बहीण जखमी झाले. हा भीषण अपघात सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास झाला. पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली आहे.
स्वाती ऊर्फ सोनी बाबासाहेब खंडागळे (वय ६, रा. तुर्काबाद खराडी) असे मृत बालिकेचे नाव आहे. तिचे वडील बाबासाहेब (३३), आई छाया (२७) आणि मोठी बहीण राणी (९) हे जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बाबासाहेब खंडागळे हे पत्नी छाया आणि दोन मुलींना घेऊन सासरी खोडेगाव येथे गेले होते. सोमवारी दुपारी बाबासाहेब हे पत्नी आणि मुलींना घेऊन खोडेगाव येथून मोटारसायकलने (क्र. एम. एच. २० डी जे ६०४५) तुर्काबाद खराडी येथे जात होते. बायपासने सातारा ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ मागाहून भरधाव आलेल्या १४ चाकी ट्रकने ( टी एस २२ टी ४१५६) त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवर पित्याजवळ बसलेली स्वाती ऊर्फ सोनी खाली पडली आणि ट्रकच्या चाकाखाली आली. डोक्यावरून चाक गेल्याने तिच्या मेंदूचा चेंदामेंदा झाला आणि ती घटनास्थळी ठार झाली. तिची आई छाया, वडील बाबासाहेब आणि मोठी बहीण राणी हे जखमी झाले.
पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. बालिकेचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी घाटीत हलविले. सातारा ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.
===============
चौकट
ट्रकचालक पोलिसांच्या ताब्यात
बालिका ठार झाल्याचे कळताच संतप्त नागरिकांनी ट्रकवर दगड फेकले. पोलिसांनी ट्रकचालक मारुफ खलिफा (रा. अहमदाबाद , गुजरात ) यास ताब्यात घेतले.
================
महिनाभरात दुसरा बळी
बायपासवर महिनाभरात आजच्या अपघातात दुसरा बळी गेला. डिसेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात रॉंग साईड पिकअप चालकाने दुचाकीस्वाराला चिरडले होते. या घटनेने बायपासवरील भरधाव वाहनांचे नियमन करणे पुन्हा गरजेचे झाले आहे.