आठ हजारांची लाच घेताना ग्रामसेवकास रंगेहाथ पकडले
By Admin | Updated: December 28, 2016 00:06 IST2016-12-28T00:03:46+5:302016-12-28T00:06:25+5:30
जालना :८ हजारांची लाच घेताना घोन्सी येथील ग्रामसेवक ज्ञानेश्वर शेरकर यास लाचलुचपत प्रतिबंध विभागाने जालन्यात सापळा लावून मंगळवारी रंगेहाथ पकडले.

आठ हजारांची लाच घेताना ग्रामसेवकास रंगेहाथ पकडले
जालना : गृह कर्जासाठी नमुना नं. ८ आणि नाहकरत प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून ८ हजारांची लाच घेताना घोन्सी येथील ग्रामसेवक ज्ञानेश्वर शेरकर यास लाचलुचपत प्रतिबंध विभागाने जालन्यात सापळा लावून मंगळवारी रंगेहाथ पकडले.
घनसावंगी तालुक्यातील घोन्सी येथील तक्रारदार एका फायनास कंपनीकडून घर बांधकामासाठी दीड लाखाचे गृह कर्ज घेणार होते. या कर्जासाठी ग्रामपंचायतीचा नमुना नं ८ व ना हकरत प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने त्यांनी ग्रामसेवक शेरकर आवश्यक त्या कागदपत्रांची मागणी केली. या कामांसाठी २५ हजारांच्या लाचेची मागणी केली.
दरम्यान, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरून २७ डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या मागणीची पडताळणी करून सापळा लावला. तक्रारदार व ग्रामसेवक यांच्यात लाचेच्या मागणीची तडजोड झाली. १५ हजार रूपये घेणार असल्याचे ग्रामसेवकाने पंचासमक्ष सांगितले. त्यापैकी ८ हजार रूपयांची रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिंबधक विभागाने रंगेहात पकडले.
सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अप्पर पोलिस अधीक्षक डी. डी, गवारे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आजिनाथ काशिद, व्ही.एल.
चव्हाण, कर्मचारी टेहरे, धायडे
दौडे, आगलावे, शेंडीवाले,
उदगीरकर आदी कर्मचाऱ्यांनी पार पाडली. (प्रतिनिधी)