दहा हजार रुपये लाच घेताना दोन पोलिसांना रंगेहाथ अटक
By Admin | Updated: August 10, 2016 00:29 IST2016-08-10T00:09:59+5:302016-08-10T00:29:11+5:30
औरंगाबाद : गुन्ह्यात आरोपीला मदत करण्यासाठी आणि तक्रारदाराच्या मुलाचे नाव वगळण्यासाठी पंधरा हजारांची लाच मागून दहा हजार रुपये रंगेहाथ स्वीकारताना

दहा हजार रुपये लाच घेताना दोन पोलिसांना रंगेहाथ अटक
औरंगाबाद : गुन्ह्यात आरोपीला मदत करण्यासाठी आणि तक्रारदाराच्या मुलाचे नाव वगळण्यासाठी पंधरा हजारांची लाच मागून दहा हजार रुपये रंगेहाथ स्वीकारताना सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना मंगळवारी सायंकाळी रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिल्लोड येथील एका हॉटेलमध्ये केली.
पोलीस कॉन्स्टेबल संदीपान भेरे (बक्कल नंबर ३२४) आणि पोलीस नाईक कॉन्स्टेबल अशोक मोरे(बक्कल नंबर ९६५)अशी अटक करण्यात आलेल्या पोलिसांची नावे
आहेत.
याविषयी अधिक माहिती देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, तक्रारदार यांच्या घरासमोर दोन मोटारसायकलमध्ये अपघात झाला होता. त्यावेळी तक्रारदाराच्या मुलाने जखमी दिगंबर मोरे यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर मोरे यांनी त्यांचे दीड लाख रुपये तक्र्रारदाराच्या मुलाने चोरून नेल्याची तक्रार सिल्लोड पोलीस ठाण्यात नोंदवली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार भेरे यांच्याकडे होता.
या गुन्ह्यात त्यांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्या मुलाचे नाव गुन्ह्यातून वगळण्यासाठी भेरे यांनी त्यांच्याकडे पंधरा हजार रुपये लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. आज मंगळवारी सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी साध्या वेशात सिल्लोड येथील तौफिक हॉटेल येथे सापळा रचला. तेथे पोलीस कर्मचारी भेरे आणि मोरे हे आले. त्यांनी पंचांसमक्ष तक्रारदाराकडे पंधरा हजार रुपये लाच मागितली. यावेळी तक्रारदाराकडून दहा हजार रुपये घेतले आणि उर्वरित पाच हजार रुपये दोन दिवसांनंतर आणून देण्याचे सांगितले. लाचेची रक्कम त्यांनी घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अप्पर अधीक्षक ज्ञानेश्वर गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, प्रमोद पाटील, कर्मचारी गोपाल बरंडवाल, अश्वलिंग होनराव, सचिन शिंदे, नितीश घोडके, चालक भारत ठोंबरे यांनी केली.