पाणी चोरी थांबणार कधी?
By Admin | Updated: April 23, 2016 23:47 IST2016-04-23T23:33:14+5:302016-04-23T23:47:43+5:30
भोकरदन : मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पद्मावती मध्यम प्रकल्पातील पाणी चोरी थांबविण्यासाठी अनेकदा पत्रव्यवहार केल्यानंतरही पाणी चोरी सुरूच आहे.

पाणी चोरी थांबणार कधी?
भोकरदन : मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पद्मावती मध्यम प्रकल्पातील पाणी चोरी थांबविण्यासाठी अनेकदा पत्रव्यवहार केल्यानंतरही पाणी चोरी सुरूच आहे. प्रशासनाचे अधिकारी सदरील प्रकल्प कोरडा पडल्यावर पाणी चोरी थांबविण्यासाठी कागदी घोडे नाचविणार आहेत काय? असा सवाल वालसांवगीच्या सरपंच रंजना बालूसेठ आहेर, पारधच्या सरपंच वीणाताई शेखर श्रीवास्तव व वाढोण्याचे सरपंच शालिकराम गवळी यांनी केला आहे़
पद्मावती मध्यम प्रकल्पात यावर्षी ८० टक्के पाणीसाठा झाला होता. मात्र सदरील धरण हे बुलडाणा जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात असल्यामुळे लघुपाटबंधारे विभागाने दोन ते तीन वेळा शेतीसाठी पाणी सोडले होते. मात्र, त्यानंतर सुध्दा या धरणातून पारध खुर्द, पारध बु, पद्मावती, वालसावंगी, मासरूळ, धामणगाव, तराडखेड आदी गावातील शेतकऱ्यांनी वीजपंपांद्वारे अवैध पाणी उपशामुळे पाणीसाठा अर्धा टक्का सुद्धा नाही. त्यामुळे या धरणावरून पाणीपुरवठा असलेल्या गावाना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. याची पूर्व सूचना सुध्दा या गावच्या सरपंचांनी तहसील, पंचायत समिती व लघू पाटबंधारे विभागासह महावितरण कंपनीला सुध्दा दिली. परिसरातील वीजपुरवठा खंडित करून पाणी चोरी थांबविण्याची विनंती केली. प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी चोरी सुरूच असल्याचे चित्र आहे.
प्रशासनाबाबत संतापाची लाट निर्माण झाली आहे़ त्यामुळे प्रशासन काय धरण कोरडे पडल्यावर पाणी चोरी थांबविण्यासाठी पथकाची नेमणूक करणार आहे काय, असा प्रश्न तीन गावातील सरपंच उपस्थित करीत आहेत. प्रशासन कारवाई कधी करणार असा सवाल वरील गावांतील सरपंचांनी केला.