ंकर्जमाफीची योग्य वेळ येणार तरी कधी?
By Admin | Updated: April 2, 2017 23:39 IST2017-04-02T23:37:59+5:302017-04-02T23:39:07+5:30
उस्मानाबाद :आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची हे सरकार वाट बघत आहेत? असा खडा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला.

ंकर्जमाफीची योग्य वेळ येणार तरी कधी?
उस्मानाबाद : सलग चार वर्षे दुष्काळाशी दोनहात केल्यानंतर गतवर्षी समाधानकारक पाऊस झाला. शेतमालही चांगला पिकला; मात्र बाजारपेठेत दाखल होताच दर घसरले. त्यामुळे पीक चांगले येऊनही हा व्यवसाय आतबट्ट्याचा ठरला. त्यामुळे साधा उत्पादन खर्चही हाती न लागल्याने आर्थिक परिस्थिती सुधारली नाही. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफीशिवाय दुसरा पर्याय नाही. याच मागणीसाठी विधिमंडळात संवैधानिक मार्गाने लढा दिल्यानंतर शासनाकडून ‘योग्य वेळी कर्जमाफी देऊ’ असे सांगण्यात येत आहे. मात्र ही योग्य वेळ येणार तरी कधी? आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची हे सरकार वाट बघत आहेत? असा खडा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला.
चंद्रपूर येथून सुरू झालेल्या संघर्ष यात्रेचे रविवारी दुपारी जिल्ह्यात आगमन होताच तालुक्यातील बेंबळी येथे शेतकऱ्यांनी सर्वांचे स्वागत केले. यानंतर उस्मानाबाद येथे आयोजित सभेत ते बोलत होते. मंचावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे, समाजवादी पार्टीचे अबु आझमी, आ. जितेंद्र आव्हाड, दिलीप सोपल, राणाजगजितसिंह पाटील, पतंगराव कदम, विद्या चव्हाण, भारत भालके, राहुल मोटे, विक्रम काळे, शेकापचे भाई धनंजय पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील आदी उपस्थित होते.
खा. चव्हाण म्हणाले की, भाजपा सरकार केवळ घोषणा करण्यात पटाईत आहेत. मागील अडीच वर्षात केलेल्या घोषणा पाहिल्या असता अंमलबजावणीच्या नावाने बोंबाबोंब असल्याचे दिसून येते. एकीकडे शेतकरी हिताच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे पीकविम्यातून कर्जाची रक्कम कपात करण्याचे आदेश काढायचे. अशा प्रकारे दुटप्पी भूमिका असणाऱ्या शासनाकडून मदतीची अपेक्षा बाळगणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे आता बघ्याची भूमिका घेण्यापेक्षा सर्वांनी संघर्ष करण्याची गरज आहे. त्याखेरीज शेती आणि शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. मतदान यंत्राच्या चुकीमुळे हे सत्तेवर आले आहेत. त्याची निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार करणार असल्याचे खा. चव्हाण यांनी सांगितले. येथील सभेनंतर ही यात्रा तुळजाभवानीचे दर्शन घेऊन सोलापूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. या सभेसाठी जिल्हाभरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘जलयुक्तमध्ये प्रचंड भ्रष्टाचार’
मुख्यमंत्र्यांसह भाजपाचे सर्वच मंत्री जलयुक्त शिवार योजनेचे गोडवे गात आहेत. मात्र ही योजना राबविताना कुठलेही निकष पाळले जात नसून, प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. गोरगरिबांचे पैसे कंत्राटदारांच्या घशात घालण्याचे काम सध्या सुरू असल्याचा आरोप खासदार अशोक चव्हाण यांनी केला. (प्रतिनिधी)