‘ठेविले अनंते तैसेचि रहावे’ ची वृत्ती संपणार कधी ?
By Admin | Updated: July 8, 2017 23:49 IST2017-07-08T23:44:36+5:302017-07-08T23:49:39+5:30
परभणी : ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे’ ही नकारात्मक भूमिका सोडून हक्काच्या अधिकारासाठी पुढाकार कधी घ्यायचा? असा सवाल विधानमंडळ अंदाज समितीचे प्रमुख आ़ उदय सामंत यांनी परभणीकरांविषयी वक्तव्य

‘ठेविले अनंते तैसेचि रहावे’ ची वृत्ती संपणार कधी ?
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सर्वसामान्यांच्या करातून होणाऱ्या विकास कामांच्या दर्जाबाबत परभणीकरांना अद्यापही सजगता आली नसून, ही सहनशीलता किती दिवस बाळगायची, ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे’ ही नकारात्मक भूमिका सोडून हक्काच्या अधिकारासाठी पुढाकार कधी घ्यायचा? असा सवाल विधानमंडळ अंदाज समितीचे प्रमुख आ़ उदय सामंत यांनी परभणीकरांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे उपस्थित झाला आहे़
महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समिती बुधवार व गुरुवार असे दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येवून गेली़ दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी समितीचे प्रमुख आ़ उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना परभणीकरांविषयी आश्चर्य व्यक्त केले़ जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था, वाळूमाफियांचा झालेला कहर पाहता इथले लोक एवढे सहनशील कसे काय आहेत, याचे आपणाला आश्चर्य वाटते़ अशी परिस्थिती आमच्या कोकणात राहिली असती तर तेथील लोकांनी आम्हाला रस्त्याने फिरू दिले नसते, असेही सामंत म्हणाले़ त्यामुळे खरोखरच परभणीकर किती सहनशील आहेत, याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला आहे़ देशाला १५ आॅगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले असले तरी आम्हा मराठवाडावासियांना मात्र तब्बल एक वर्ष एक महिना दोन दिवस उशिराने म्हणजे १७ सप्टेंबर १९४८ रोजी स्वातंत्र्य मिळाले़ मराठवाडा हा निजामाच्या ताब्यात होता़ निजामाकडे हे संस्थान १७२४ पासून होते़ पहिला निजाम कमरुद्दीन खानपासून सुरू झालेला या संस्थानचा प्रवास शेवटचा निजाम उस्मान अली याचे संस्थान खालसा झाल्यानंतर मराठवाडा निजामाच्या जोखडातून सुटला़ निजामाने प्रजेवर प्रचंड जुलूम केला़ धाक दपटशहा, खंडणी वसूल करून सर्वसामान्य जनतेत दहशत पसरविली़ कालांतराने निजामाची सत्ता गेली़ मराठवाडा स्वतंत्र झाला़ परंंतु, त्या दहशतीने सहन करण्याची असलेली वृत्ती मात्र ^६९ वर्षांनंतरही फारशी कमी झाली नसल्याचे सातत्याने दिसून आले़ त्यामुळेच तर मराठवाड्यावर सातत्याने अन्याय होत आला आहे़ परिणामी विकासापासून मराठवाडा कोसो दूर राहिला़ मराठवाड्याच्या हक्कासाठी अनेक चळवळी उभ्या राहिल्या़ या चळवळीतील काही शिलेदारांनी मराठवाड्याच्या विकासाचा मार्ग दाखविला़ परंतु, त्याची परंपरा पुढे चालू राहिली नाही़ परिणामी विभागाच्या विकासाची दरी रुंदावत गेली अन् आजही मराठवाडावासियांना विकासकामांसाठी मुंबईकरांकडे हात पसरावे लागतात़ ही शोकांतिकाच म्हणावी लागेल़ यावर पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे़
संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगात ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे। चित्ती असो द्यावे समाधान।। असे सांगितले असले तरी आपण मात्र केवळ ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे’ याच अर्धवट वचनाचा वापर करून आहे त्या परिस्थितीतच राहणे पसंत करतो़ प्रत्यक्षात या अर्धवट वचनाचा वापर तमाम आळशी व कामचुकार व्यक्तींनी केला आहे़ प्रत्यक्षात दुसरा अर्धा भाग महत्त्वाचा आहे़ हे सहसा ध्यानात घेतले जात नाही़ ‘चित्ती असो द्यावे समाधान’ हे कोठून येते हे चित्ताचे समाधान ? यशाने, धनाने, कीर्तीने, क्षणिक समाधान येतही असेल, पण कायमचे समाधान मिळविण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे, मुळात तोच दृष्टिकोन सोडून दिल्याने निर्माण झालेल्या नकारात्मकतेतून आपले हक्क काय आहेत? अधिकार काय आहेत? हेच आपण विसरून गेलो आहोत़ त्यामुळेच शासकीय मालमत्ता देशाची संपत्ती न समजता ती फुकट लाटण्याचे साधन आहे, अशी वृत्ती बळावत जात आहे़ प्रत्यक्षात सर्वसामान्य जनतेच्या करातून शासकीय मालमत्ता उभ्या राहतात़ त्यामुळे त्या मालमत्ता जतन करणे व शासकीय करातून निर्माण होणाऱ्या विकास कामांकडे कटाक्षाने लक्ष देणे हे प्रत्येक देशवासियाचे कर्तव्य आहे़ व तीच खरी देशभक्ती आहे़ सीमेवरील सैनिक ज्याप्रमाणे कर्तव्य निभावत असतात तेच कर्तव्य प्रत्येक भारतीय नागरिकाने त्याच्या दैनंदिन व्यवहारातून प्रामाणिकपणे निभावल्यास अपप्रवृत्तीला थारा मिळणार नाही़ परंतु, नेमके लोकशाहीचा अर्थ न समजलेले अजाण नागरिक मात्र याकडे दुर्लक्ष करतात़ परिणामी त्याचा गैरफायदा घेणाऱ्या आपप्रवृत्ती वाढत आहेत. परभणी जिल्ह्यातही रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे़ या रस्त्यांचे होणारे काम दर्जेदार होते की नाही, याकडे कोणी लक्ष देत नाही़ पावसाच्या प्रत्येक थेंबासाठी आसुसलेल्या जनतेला नदीतील वाळू ही नैसर्गिक ठेवा आहे व ती जपली तर त्यातूनच आपणाला सुबत्ता येईल, हे गमक कळेनासे झाले आहे़ त्यामुळेच बेसुमार वाळू उपसा होत आहे़ दोन-चार पैशांसाठी फितूर झालेल्या मंडळींकडे दुर्लक्ष केले जाते़ परिणामी निसर्गाचा तर ऱ्हास होतोच आहे़ शिवाय दुष्काळाचे संकट आणखी गडद होत जाते. चुकीच्या बाबींविषयी क्रोध व्यक्त करण्याची आणि आपले सामर्थ्य दाखवून देण्याची वेळ आली असताना त्याकडे कानाडोळा करणे हे लोकशाहीतील बेजबाबदारपणाचे लक्षण आहे़ शेवटी चुकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे म्हणजेच त्याला एक प्रकारे समर्थन देणेच होय.