अंबडच्या पाईपलाईन जोडणीस मुहूर्त कधी लागणार ?

By Admin | Updated: July 4, 2014 00:18 IST2014-07-03T23:25:33+5:302014-07-04T00:18:19+5:30

रवि गात, अंबड शहरास जालना-जायकवाडी योजनेतून पाणी मिळावे या मागणीस सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे.

When will the Ambani pipeline connect? | अंबडच्या पाईपलाईन जोडणीस मुहूर्त कधी लागणार ?

अंबडच्या पाईपलाईन जोडणीस मुहूर्त कधी लागणार ?

रवि गात, अंबड
शहरास जालना-जायकवाडी योजनेतून पाणी मिळावे या मागणीस सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे. मात्र मागील एक वर्षापासून नगरपालिका प्रशासनाकडून लवकरच जोडणी करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात येणारी जोडणी केव्हा होणार व अंबड शहरास भेडसावणारी पाणीटंचाई केव्हा दूर होणार असा प्रश्न अंबड शहरातील नागरिकांना पडला आहे. मात्र जोडणी नक्की केव्हा होणार या प्रश्नाचे ठोस उत्तर कोणाकडेही नाही. पावसाने लवकर हजेरी लावली नाही तर अंबड शहरास भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.
जालना शहरास सतत भेडसावणाऱ्या पाणी टंचाई दुर करण्यासाठी जायकवाडी-जालना पाणी पुरवठा योजना ही महत्वाकांक्षी योजना आखण्यात आली. पैठण येथील जायकवाडी धरणातुन पाणी आणून जालनेकरांची तहान भागवण्याची तयारी या योजनेव्दारे करण्यात आली. योजनेचा मार्ग पैठण, पाचोड, अंबड व जालना असा नियोजित करण्यात आला. विशेष म्हणजे योजनेचे जलशुध्दीकरण केंद्राची मोठी इमारत शहरातील मत्स्योदरी देवी मंदिराच्या पायथ्याशी उभारण्यात आली. जालनेकरांची तहान भागवून या योजनेतील सध्या केवळ २ एमएलडी पाणी अंबड शहरास देण्याची मागणी या योजनेदरम्यान अंबड मधील बहुतांश सर्वच राजकीय पक्षांकडून करण्यात आली. सुरुवातीस जालना शहरातुन या मागणीस विरोध झाला. कालातंराने योजनेचे काम पूर्ण झाले तरी या मागणीसंदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. या दरम्यान अंबडच्या सर्वपक्षीयांच्या वतीने जलआंदोलनही करण्यात आले. लवकरच जायकवाडी-जालना योजनेतून अंबड शहरासाठी जलशुध्दीकरण केंद्रातून जोडणी करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. त्यावेळी बहुतांश राजकीय पक्षांनी आपल्याच पक्षामुळे अंबड शहरास जायकवाडी-जालना योजनेतून पाणी मिळणार असल्याचे दावे केले, फटाके फोडले, मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी जायकवाडी योजनेतून अंबड शहरास पाणी मिळाले असून त्याचे श्रेय आमच्याच पक्षाचे कसे हे सांगणारे होर्डिंग्जही शहरभर विविध पक्षांनी लावले.
मात्र हा सर्व प्रकार बोलाचीच कढी, बोलाचाच भात ठरला. योजना कार्यान्वित होऊन वर्ष उलटून गेले तरी अद्यापही अंबडकरांना या योजनेतुन पाण्याचा एक थेंबही मिळालेला नाही. सध्या अंबड शहरातील नागरिक तीव्र पाणीटंचाईने त्रासलेले आहेत. नगरपालिकेच्या वतीने शहरास सात दिवसांतून एकदा म्हणजे आठवड्यात एक वेळेस, म्हणजेच महिन्यातून केवळ चार वेळा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. दिवसागणिक पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत चालल्या आहेत. नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. टँकरव्दारे पाणी विकत घेऊन पाण्याची तजवीज करताना नागरिक दिसतात. पैसे देऊनही टँकरचालकांकडुन पाणी मिळणे मुश्किल बनले आहे. टँकरचालकांकडे मागणी जास्त व पुरवठा कमी असल्याने मोबाईलवर आॅर्डर घेऊन पाणीपुरवठा केला जात आहे.
शहरवासीय भीषण टंंचाईने हतबल, पाण्यासाठी दारोदार भटकंती..
एकीकडे शहरात भीषण पाणी टंचाई असताना दुसरीकडे नागरिकांना शहरातून दररोज लाखो लिटर पाणी जालन्याकडे जाताना हताशपणे पाहावे लागत आहे. जायकवाडी धरणातुन येणारे लाखो लिटर पाण्याचे शहरातील जलशुध्दीकरण केंद्रात शुध्दीकरण करण्यात येते. नंतर जलवाहिनीव्दारे शुध्दीकरण करण्यात आलेले पाणी जालना शहराकडे रवाना करण्यात येते. धरणातून लाखो लिटर पाणी शुध्दीकरण केंद्रात येते, त्याचे शुध्दीकरण केले जाते व जालन्यास पाठवून दिले जाते, मात्र यातील एक थेंबसुध्दा अंबड शहरातील तहानलेल्या नागरिकांना मिळत नाही. या सर्व प्रकारामुळे शहरातील नागरिकांमधुन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. लवकरात लवकर योजनेतून शहरासाठी जोडणी करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

Web Title: When will the Ambani pipeline connect?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.