कचरा जाळणे कधी थांबणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 22:39 IST2019-03-04T22:39:07+5:302019-03-04T22:39:18+5:30
बजाजनगरात खदाणीच्या जागेवर जमा झालेला कचरा भरदिवसा जाळला जात आहे. उघड्यावर कचरा जाळला जात असल्याने प्रदुषणात वाढ होत असून, नागरिकांना धुराचा त्रास सहन करावा लागत आहे.

कचरा जाळणे कधी थांबणार?
वाळूज महानगर : बजाजनगरात खदाणीच्या जागेवर जमा झालेला कचरा भरदिवसा जाळला जात आहे. उघड्यावर कचरा जाळला जात असल्याने प्रदुषणात वाढ होत असून, नागरिकांना धुराचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी डोळेझाक करीत आहे. बजाजनगरात कचरा जाळण्याचे प्रकार कधी थांबणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
येथील नागरी वसाहतीतून दररोज जवळपास चार टन कचरा जमा होतो. कचरा संकलनासाठी कचरा डेपोची व्यवस्था नाही. त्यामुळे एमआयडीसीकडून जमा झालेला कचऱ्याची येथील रामलीला मैदानासमोरील खदाणीच्या मोकळ्या जागेवर विल्हेवाट लावली जात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी व डासांचा प्रार्दुभाव वाढला आहे. विशेष म्हणजे कचरा याच ठिकाणी जाळला जात आहे. परिसरातील रहिवासी व रस्त्याने ये-जा करणाऱ्या पादचारी व वाहनधारकांना दुर्गंधीबरोबरच धुराचाही त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय प्रदूषणातही वाढ होत आहे. अनेक दिवसांपासून हा प्रकार खुलेआमपणे सुरु असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.