सोनिया गांधी पोलिसांचे कडे भेदतात तेव्हा...
By Admin | Updated: October 10, 2014 00:42 IST2014-10-10T00:32:34+5:302014-10-10T00:42:49+5:30
औरंगाबाद : पोलिसांचे कडे भेदून सोनिया गांधी थेट बॅरिकेडस्वर चढल्या आणि त्यांनी महिलांचे अभिवादन स्वीकारले.

सोनिया गांधी पोलिसांचे कडे भेदतात तेव्हा...
औरंगाबाद : आमखास मैदानावर पोलिसांचे कडे भेदून सोनिया गांधी थेट बॅरिकेडस्वर चढल्या आणि त्यांनी हातात हात घेऊन महिलांचे अभिवादन स्वीकारले. अचानकपणे घडलेला हा प्रकार पाहून पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.
अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सुरक्षेसाठी औरंगाबादेतील सभेत पोलिसांनी अधिक काळजी घेतली होती. व्यासपीठासमोर काही अंतरावर दोन बॅरिकेडस्चे रिंगण उभारण्यात आले होते. जेणेकरून सभा आटोपल्यानंतर सोनियाजींना नेहमीप्रमाणे थेट नागरिकांमध्ये जाता येणार नाही; पण पोलिसांची ही अटकळ सोनियाजींनी सपशेल फोल ठरविली. आमखास मैदानावरील सभा आटोपल्यानंतर सोनियाजी व्यासपीठावरून खाली उतरल्या अन् त्या थेट बॅरिकेडस्जवळ गेल्या. त्यांच्यासोबत मग माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोकराव चव्हाण, माणिकराव ठाकरे हेदेखील लगबगीने गेले. तेथे नागरिकांना हात उंचावून अभिवादन करीत करीत सोनिया गांधी पुढे जात होत्या. त्यांच्या आजूबाजूला पोलिसांचा मोठा ताफा साखळी करून चालत होता अन् अचानक सोनियाजी बॅरिकेडस्वर चढल्या आणि त्यांनी हातात हात घेऊन महिलांचे अभिवादन स्वीकारले.
कशाचीही पर्वा न करता सोनिया गांधी यांनी अचानकपणे घेतलेला हा पवित्रा पाहून सोबत असलेले पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे हेदेखील चकित झाले. विशेष म्हणजे, व्यासपीठावरून खाली उतरल्यानंतर खास सोनिया गांधी यांच्यासाठी हेलिपॅडपर्यंत जाण्याकरिता बुलेटप्रूफ वाहन उभे होते; पण त्या त्यामध्ये न बसता नागरिकांना भेटण्यासाठी पुढे सरसावल्या. सोनियाजी येत आहेत, हे समजताच नागरिकही बॅरिकेडस्कडे धावले. आमखास मैदानावर नागरिकांची एकच धावपळ उडाली. पोलीस सरसावले. पोलिसांनी सोनियाजींना कडे केले; पण सोनियाजी नेहमीप्रमाणे नागरिकांना हस्तांदोलन केल्याशिवाय तेथून निघाल्याच नाहीत. हा प्रकार पाहून उपस्थित नागरिकही भारावून गेले. सोनियाजी बॅरिकेडस्भोवती हात उंचावून अभिवादन करीत चालत होत्या. त्यावेळी नागरिकांनी ‘सोनियाजी जिंदाबाद, सोनियाजी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देऊन आमखास मैदानाचा परिसर दणाणून सोडला.