हरवलेला अलीम नऊ वर्षांनंतर परततो तेव्हा...
By Admin | Updated: July 3, 2017 23:52 IST2017-07-03T23:48:43+5:302017-07-03T23:52:01+5:30
जालना : वडिलांनी रागावले म्हणून रागाच्या भरात तो नऊ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला... रेल्वेने थेट आग्रा गाठले...

हरवलेला अलीम नऊ वर्षांनंतर परततो तेव्हा...
बाबासाहेब म्हस्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वडिलांनी रागावले म्हणून रागाच्या भरात तो नऊ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला... रेल्वेने थेट आग्रा गाठले...तिथे मिळेल ते काम करु लागला...पण आईवडिलांची आठवण त्याला स्वस्थ बसू देईना... अखेर रमजान ईदला त्याने नऊवर्षांपूर्वी त्याच्याजवळ असलेल्या मोबाईल क्रमाकांवरुन वडिलांशी संपर्क साधला आणि मुलाचा शोध घेऊन थकलेल्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. रमजानमध्ये केलेल्या उपवासाचे फळ मिळाल्याची भावना जालन्यातील शेख अब्दुल कुटुंबायांनी सोमवारी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
जुन्या जालन्यातील देहेडकरवाडी परिसरातील शिशटेकडी भागात राहणारा अब्दुल अलीम अब्दुल खय्यूम शेख २९ डिसेंबर २००९ मध्ये वडील रागावले म्हणून घरातून निघून गेला. जालना रेल्वेस्थानकातून तो औरंगाबादला पोचला आणि तेथून एका रेल्वेत बसून थेट आग्रा येथे पोचला. अनेक दिवस इकडे तिकडे भटकंती केली. पोटासाठी मिळेल ते काम केले. त्यानंतर आग्रा येथील त्रिमूर्ती सिमेंट कंपनीत काम करू लागला आणि मित्रांसोबत तिथेच रमला. इकडे मुलाच्या शोध घेण्यासाठी शेख खय्यूम कुटुंबीयांनी औरंगाबाद, पुणे, मुंबई, नाशिक, मनमाड, अजमेर, हैदराबाद, दिल्ली पालथी घातली. मात्र, मुलगा अलीम काही सापडला नाही. पोलिसांकडे चकरा मारून थकलेल्या शेख कुटुंबीयांनी मुलगा सापडेल, ही आशाच सोडली. दरम्यान, तिकडे अब्दुल अलीम सोबत सिमेंट कंपनीत काम करणारे हिंदू समाजाचे मित्र खास त्याच्यासाठी ईद साजरी करायचे. यंदाच्या ईदला त्यांनी अलीमला वडिलांना फोन करण्याचा आग्रह धरला. अलीमने शुक्रवारी वडिलांच्या जुन्या क्रमांकावर संपर्क केला. आवाज परिचयाचा वाटल्यानंतर अब्दुल खय्यूम यांनी अधिक चौकशी केली. मुलाने सर्व हकीकत सांगताच अब्दुल खय्यूम यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांनी संपूर्ण पत्ता घेऊन नातेवाइकांसह आग्रा गाठले. सोमवारी सर्वजण अलीमला घेऊन जालन्यात पोहोचले.