व्हॉट्सअॅप रजिस्ट्रेशन कोड लिंक स्कॅम परतला; 'ओके' वर क्लिक करणे टाळा, ५३ जण फसले

By सुमित डोळे | Published: March 6, 2024 03:45 PM2024-03-06T15:45:02+5:302024-03-06T15:50:01+5:30

नोटिफिकेशनला कॅन्सलचा पर्याय नसल्याने धोकादायक, क्षणात डेटा हॅकर्सच्या हाती जातो

WhatsApp Registration Code Link Scam Returned; Avoid clicking 'OK', 53 people were fooled | व्हॉट्सअॅप रजिस्ट्रेशन कोड लिंक स्कॅम परतला; 'ओके' वर क्लिक करणे टाळा, ५३ जण फसले

व्हॉट्सअॅप रजिस्ट्रेशन कोड लिंक स्कॅम परतला; 'ओके' वर क्लिक करणे टाळा, ५३ जण फसले

छत्रपती संभाजीनगर : दोन वर्षांपूर्वी इंटरनेट जगतात धुमाकूळ घातलेला ''''व्हॉट्सअॅप रजिस्ट्रेशन कोड लिंक स्कॅम'''' पुन्हा परतला आहे. यात व्हॉट्सअॅपवर अचानक व्हॉट्सअॅप रजिस्ट्रेशन रिक्वेस्टेड असा मेसेज प्राप्त होतो. तुम्ही अशी रिक्वेस्ट केली नसेल तर ''''ओके'''' दाबा, असेही त्यात लिहिलेले असते. मात्र, त्या ''''ओके'''' पर्यायावर क्लिक करताच तुमच्या संपूर्ण व्हॉट्सअॅपचा ताबा अकाऊंट हॅकर्स म्हणजेच सायबर गुन्हेगारांना मिळत आहे.

जगभरात व्हॉट्सअॅपचे कोट्यवधी वापरकर्ते आहेत. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील मोबाइलधारक याचा संवादासाठी प्रभावी असलेल्या व्हॉट्सअॅपचा वापर करतात. मात्र, याच व्हॉट्सअॅपच्या नावे गेल्या काही वर्षांमध्ये अनेकदा सायबर गुन्हेगारांकडून घोटाळे केले गेले. काही वर्षांपूर्वी पिंक व्हायरसने अनेकांना गंडा घातला होता. २०२०-२१ मध्ये इंटरनेट, सोशल मीडियामध्ये अनेक मोबाइलधारकांच्या मोबाइलवर हल्ला केलेल्या व्हॉट्सअॅप रजिस्ट्रेशन कोड लिंक स्कॅम आता पुन्हा एकदा सक्रिय झाला. पोलिसांकडे अनेक तक्रारदारांनी धाव घेतल्यानंतर ही बाब निदर्शनास आली.

विनंती केलेली नसतानाही व्हेरिफिकेशन कोड, नेमका कसा होतोय स्कॅम?
-सायबर गुन्हेगार परस्पर तुमचा फोन नंबर टाकून व्हॉट्सअॅपवर रजिस्टर करण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर तुम्हाला ४ ओळींचे पुश नोटिफिकेशन प्राप्त होते. यात व्हॉट्सअॅपप्रमाणेच डिझाइन, लोगो असल्याने अनेकांचा विश्वास बसतो.

-यात ''''लर्न मोअर'''' व ''''ओके'''' असे दोन पर्याय उपलब्ध असतात.
-त्यापैकी कुठल्याही पर्यायावर क्लिक करताच तुमच्या संपूर्ण व्हॉट्सअॅपचा ताबा हा सायबर गुन्हेगारांना मिळतो.
-तुम्ही ते रिकव्हर करेपर्यंत तुमचा महत्त्वाचा डेटा चोरून त्याचा धोकेदायकरीत्या वापर केला जाण्याची शक्यता असते. अनेकदा खासगी डेटा असल्यास ब्लॅकमेलिंग केले जाते.

म्हणून अधिक धोकेदायक
सामान्यत: व्हॉट्सअॅप अशा प्रकारचे नोटिफिकेशन प्राप्त झाल्यानंतर व्हेरिफिकेशन कोडची आवश्यकता असते. मात्र, या स्कॅम लिंकमध्ये त्याची आवश्यकता पडत नाही. केवळ ओकेवर क्लिक करताच अकाऊंट हॅक होत आहे. शिवाय, यात कॅन्सलचा पर्यायच उपलब्ध नाही. त्यामुळे हा प्रकार अधिक धोकादायक मानला जात असल्याचे निरीक्षक सायबर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अमोल सातोकदर यांनी सांगितले.

५३ वापरकर्ते फसले
सदर पुश नाेटिफिकेशनमध्ये कॅन्सलचा पर्याय नसल्याने अनेक जण गोंधळून जातात. परंतु व्हॉट्सअॅप कधीच तुम्हाला असे नोटिफिकेशन पाठवत नाही. स्कॅमच्या नोटिफिकेशनवर कुठलेही क्लिक न करता केवळ मोबाइल डिस्प्लेवरील बॅकचा पर्याय निवडून दुर्लक्ष करा, असे सातोदकर यांनी सांगितले.

नंबर कुठून मिळतो?
तुमचा मोबाइल क्रमांक सायबर गुन्हेगारांपर्यंत अनेक मार्गाने सहज उपलब्ध होतो. यात डार्क वेब ज्याला डिजिटल माहिती विकली जाणारे ब्लॅक मार्केट म्हणूनदेखील ओळखले जाते. यात सोशल मीडिया साइट्स, फिशिंग, विविध गेम्स, पॉलिसी वेबसाइट्सवर तुम्ही तुमचे नाव, मोबाइल क्रमांक नोंदवलेले असते. ही माहिती या ब्लॅक मार्केटमध्ये कोट्यवधी रुपयांना विकली जाते. ज्यामार्फत पुढे सायबर गुन्हेगार तुमच्यापर्यंत पोहोचतात.

जितके प्रभावी तितके घातक
इंटरनेट जगत हे जितके प्रभावी तितकेच घातक व असुरक्षितदेखील आहे. अनोळखी लिंकद्वारे सायबर गुन्हेगार थेट तुमचा मोबाइल, बँक खात्यात प्रवेश करू शकतात. तुमचे एक क्लिकने अतोनात नुकसान होते. ऑनलाइन वावरताना तुमची माहिती कुठे, किती प्रमाणात शेअर करताय, याचा विचार करा. पोलिसांकडून देखील याप्रकरणी सातत्याने तपास करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
-नवनीत काँवत, पोलिस उपायुक्त. 

Web Title: WhatsApp Registration Code Link Scam Returned; Avoid clicking 'OK', 53 people were fooled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.