टोपीखाली दडलंय काय? कन्नड तालुक्यात १२ नवीन महाविद्यालयांना मंजुरी? भाग १
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:05 IST2021-04-28T04:05:17+5:302021-04-28T04:05:17+5:30
सुरेश चव्हाण कन्नड : राज्य शासनाने १५ एप्रिलरोजी परिपत्रक काढून महाराष्ट्रातील ७७ नवीन महाविद्यालयांना इरादापत्र मंजूर ...

टोपीखाली दडलंय काय? कन्नड तालुक्यात १२ नवीन महाविद्यालयांना मंजुरी? भाग १
सुरेश चव्हाण
कन्नड : राज्य शासनाने १५ एप्रिलरोजी परिपत्रक काढून महाराष्ट्रातील ७७ नवीन महाविद्यालयांना इरादापत्र मंजूर केले. त्यापैकी एकट्या कन्नड तालुक्यात नवीन १२ महाविद्यालये कायम विनाअनुदानित तत्त्वावर सुरू करण्याबाबत शासनाने मंजुरी दिली आहे. तथापि यापैकी काही महाविद्यालयांच्या इरादापत्रास मंजुरी देताना सर्व नियमांना तिलांजली दिल्याचे ठळकपणे दिसत आहे. त्यामुळे यात गौडबंगाल दिसत असून टोपीखाली नक्कीच काही तरी दडलेलं असल्याचं दिसत आहे.
राज्य शासनाच्यावतीने महाविद्यालयांना मंजुरी देताना अनेक निकष पाळले जातात. यामध्ये दोन महाविद्यालयांमधील अंतर किती आहे, परिसरातील विद्यार्थ्यांची उपलब्धता या दोन बाबींकडे विशेष लक्ष दिले जाते. मात्र सत्ता आल्यानंतर प्रत्येक राजकीय नेता आपले हितसंबंध जोपासण्यासाठी सरसावतात किंवा लाभाच्या संस्था पदरात पाडून घेण्यासाठी आटापिटा करतात आणि त्यांचे हितसंबंध जोपासताना मग सत्ताधाऱ्यांकडून नियमांनाही तिलांजली देण्यात येते. हीच बाब कन्नड तालुक्यात मंजूर करण्यात आलेल्या नवीन महाविद्यालयांबाबत घडली आहे आणि यातूनच नियमांत बसत नसतानाही या महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आल्याची चर्चा सध्या शैक्षणिक वर्तुळात होत आहे.
३१ जानेवारी २०२० रोजीच्या शासननिर्णयानुसार शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी पारध येथील हरिवंशराय बच्चन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेला औराळा येथे नवीन महाविद्यालयासाठी इरादापत्र देण्यात आलेले आहे. मात्र, असे असताना यावर्षी पुन्हा दुसऱ्या संस्थेला इरादापत्र देण्यात आले आहे.
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांनी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षात महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात इरादापत्र मिळण्याबाबतचे प्रस्ताव शासनमान्यतेसाठी शिफारशीत करण्यात आले होते. संदर्भाधिन शासननिर्णयाच्या परिशिष्ट ब मध्ये इरादापत्र देण्यासंदर्भात विहित करण्यात आलेल्या निकषानुसार सदर प्रस्तावांची तपासणी करण्यात आली असून शासनाने विहित केलेल्या अटी-शर्तींच्या अधिन राहून कायम विनाअनुदान तत्त्वावर इरादापत्र मंजूर करण्यात येत आहे, असे शासन परिपत्रकात उल्लेखित केले आहे. (क्रमशः)
चौकट
मंजुरी देण्यात आलेल्या शैक्षणिक संस्था :
नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ - आंबातांडा, ज्ञानदीप बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था - औराळा, राधा गोविंद व क्रीडा प्रसारक मंडळ - कोळवाडी, न्यू आदर्श एज्युकेशन ॲण्ड वेलफेअर सोसायटी- सावरगाव, जयलक्ष्मी सांस्कृतिक व शिक्षणसंस्था - निपाणी, ताज फाैंडेशन संचलित राष्ट्रीय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय - नाचनवेल व चिकलठाण, श्रध्दा शैक्षणिक व बहुउद्देशीय प्रतिष्ठान नागद- चापानेर, करंजखेडा, नागद, आडगाव व वडाळी.