झालर क्षेत्राचे आता काय होणार?
By Admin | Updated: December 11, 2014 00:47 IST2014-12-11T00:17:46+5:302014-12-11T00:47:08+5:30
औरंगाबाद : सिडकोने या योजनेतून अंग काढून घेतल्याने आता या गावांचा विकास करण्यासाठी कोणती संस्था जबाबदारी घेते, याकडे परिसरातील ग्रामस्थांबरोबरच बिल्डरांचेही लक्ष लागले आहे.

झालर क्षेत्राचे आता काय होणार?
औरंगाबाद : औरंगाबाद परिसरातील २८ गावांचा योजनाबद्ध विकास करण्यासाठी नेमण्यात आलेली प्राधिकृत संस्था सिडकोने या योजनेतून अंग काढून घेतल्याने आता या गावांचा विकास करण्यासाठी कोणती संस्था जबाबदारी घेते, याकडे परिसरातील ग्रामस्थांबरोबरच बिल्डरांचेही लक्ष लागले आहे.
झालर क्षेत्राच्या विकासासाठी शासनाने नियुक्त केलेल्या व स्पेशल प्लॅनिंग अॅथॉरिटी असलेल्या सिडकोने २८ गावांचा विकास आराखडाही तयार केला आहे. तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. २००६ साली सिडकोकडे झालर क्षेत्राच्या विकासाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर आठ वर्षांत दोन आराखडे सादर करण्यापलीकडे सिडकोला फार काही करता आले नाही.
आता मात्र सिडकोने झालर क्षेत्रातून अंग काढून घेतल्याने आता विकासाचा हा मार्ग खडतर झाला आहे. सातारा आणि देवळाई या दोन गावांसाठी स्वतंत्र नगर परिषद झाल्याने तेथील नागरिकांचा प्रश्न सुटला आहे; मात्र आणखी २६ गावे यामध्ये अडकली आहेत. सिडकोने २८ गावांच्या विकासासाठी पाच झोन तयार करून त्याच्या विकासाचा आराखडा तयार केला होता. सातारा आणि देवळाईसाठी स्वतंत्र झोन होते. आता केवळ चार झोनअंतर्गत २६ गावे आहेत.
यापैकी झोन ३ मध्ये येत असलेल्या पिसादेवी, गोपालपूर, साजापूर, कच्चेघाटी, हिरापूर आदी गावांमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने जागा घेऊन ठेवल्या आहेत. त्याचबरोबर झोन ४ मधील सुंदरवाडी, झाल्टा, गांधेली आणि बाळापूर या बीड बायपास रस्त्यावरील गावांमध्ये सध्याच मोठ्या संख्येने बांधकाम व्यावसायिक घुसले आहेत. याठिकाणी नागरी वसाहती होण्याचे प्रमाण वाढत आहे. झोन २ मधील सावंगी परिसरातही मोठमोठे अपार्टमेंट उभे राहण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे भविष्यात नागरी सुविधांचा प्रश्न निर्माण होणार आहे. २८ गावांमध्ये एक व्यावसायिक संस्था म्हणून सिडकोने प्लॅन केला आहे. काही तक्रारी वगळल्या तरीही सिडकोने भविष्याचा वेध घेत सुविधांचे जाळे निर्माण करण्याचे नियोजन केले आहे. (समाप्त)