पोरगं दुरुस्त होईपर्यंत काय खावं बाबा..!

By Admin | Updated: March 19, 2016 20:15 IST2016-03-19T20:10:09+5:302016-03-19T20:15:43+5:30

वसमत : गावाकडे मजुरी मिळेना, जन्मजात असलेला नंदीबैलाचा धंदा चालेना, म्हणून इकडं आलो तर इथं हे वाढण समोर आले.

What should I eat until my son gets corrected ..! | पोरगं दुरुस्त होईपर्यंत काय खावं बाबा..!

पोरगं दुरुस्त होईपर्यंत काय खावं बाबा..!

वसमत : गावाकडे मजुरी मिळेना, जन्मजात असलेला नंदीबैलाचा धंदा चालेना, म्हणून इकडं आलो तर इथं हे वाढण समोर आले. आता पोरगं दुरुस्त होईपर्यंत काय खावं, कुटुंब कसं चालवावं, असा आक्रोश वसमत येथील स्फोटातील जखमी मुलाच्या पित्याचा होता. मुलगा वाचला काही तरी पूर्वी जन्मीच पुण्य होत, असे म्हणत कधी दैवाला दूषणं देत तर कधी देवाचे आभार मानत तो पिता अश्रू ढाळत आहे.
वसमत येथील बहिर्जीनगर भागात भंगार शोधत फिरणाऱ्या अंकुश नक्कलवार हा मुलगा स्फोटात गंभीररित्या भाजला गेला. त्याच्यावर वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तेथे त्याच्यासंगे सोयऱ्याची गर्दी आहे. घटना घडल्यापासून त्याच्या वडिलाच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. हट्टा येथील स्फोटात चार जण दगावल्याची खबर कानावर पडल्यापासून तर चिंता वाढली आहे. सदर प्रतिनिधीने उपजिल्हा रुग्णालयात जखमी मुलाचे वडील श्यामराव चेनबा नक्कलवार रा. मुदखेड, जि. नांदेड ह. मु. असेगाव रोड वसमत यांची भेट घेतली.
अशा दिवसांत व मजुरी व्यवसाय नसलेल्या श्यामरावने त्यांचा मुलगा वाचला, हेच बरं झाले, असे म्हणत बोलणेच बंद केले. त्यास बोलते केले असता, पोराची माय दोन महिन्यांपूर्वी वारली. घरात सहा लेकरे आहेत. मूळचा व्यवसाय नंदी बैलाचा आहे. मात्र नंदीबैल सांभाळणे अवघड व धंदा त्याहीपेक्षा अवघड म्हणून आता फक्त नावच नंदीवाले राहिले आहे. मुदखेडला मजुरी मिळेना म्हणून कुटुंब वसमतला आणले. लहान लहान वस्तू विकणे, भंगार जमा करणे हा व्यवसाय करुन गुजरान करतो. आज ही घटना घडल्याने यापुढे मुलाला भंगारासाठी पाठवणार नाही. आता मुलगा दुरुस्त होईपर्यंत खाण्याचेही हाल होतील. शासनाची कोणतीच योजना, सुविधा आजवर आम्हाला मिळाली नसल्याचे त्यांचे म्हणने आहे. सकाळपासून मोठ-मोठ्या अधिकारी मंडळीने दिलेल्या भेटी, काढलेले फोटो, झालेली गर्दी याने काहीतरी लाभ होईल. जीवनात प्रकाश येईल, अशी वेडी आशाही त्यांच्या बोलण्यातून जाणवली.
या भटक्यांच्या पालापर्यंत ‘अन्नसुरक्षा’ पोहोचवणार कोण? हा खरा सवाल आहे. (वार्ताहर)
वसममध्ये डब्याच्या स्फोटात युवक जखमी झाल्याची अपघात म्हणून नोंद मुलाच्या जबाबावरून पोलिसांनी घेतली आहे. घटनास्थळावरील मातीचे नमुने, फुटलेल्या कॅनचे नमुने व त्यातील रसायनाचे नमुने फॉरेन्सीक लॅबमध्ये तपासणीसाठी सीलबंद केले आहेत, असे पोलिस निरीक्षक अशोक मैराळ म्हणाले. घटनेनंतर पोलिस अधीक्षक कैलास कणसे, डीवायएसपी पियुष जगताप, तहसीलदार सुरेखा नांदे व बॉम्बशोधक पथकानेही भेट दिली आहे.

Web Title: What should I eat until my son gets corrected ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.