चौकशी अहवालात दडलंय काय़़?
By Admin | Updated: November 16, 2015 00:39 IST2015-11-15T23:51:50+5:302015-11-16T00:39:26+5:30
लातूर : जिल्हा परिषदेअंतर्गत औसा तालुक्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून सर्वाधिक कामे करण्यात आली आहेत़

चौकशी अहवालात दडलंय काय़़?
लातूर : जिल्हा परिषदेअंतर्गत औसा तालुक्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून सर्वाधिक कामे करण्यात आली आहेत़ मात्र यातील अनेक कामांत अनियमितता असल्याचे निदर्शनास आले असून, कामावर बोगस मजुरांची नावे लावल्याची धक्कादायक बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली होती़ याची दखल घेवून जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी डॉ़ अनंत गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती़ या समितीने चौकशी पूर्ण केली असून, अहवाल तयार केला आहे़ मात्र अद्याप तो अहवाल खुला केला नाही़ दरम्यान, या अहवाल दडलंय काय याची उत्सुकता प्रशासनासह जिल्ह्यात आहे़
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत औसा तालुक्यात मोठ्या प्रमाणात सिंचन विहिरी, रस्ते, जलसंधारण (कृषी), वैयक्तिक शौचालय अशी अनेक प्रकारची कामे करण्यात आली़ या कामांवर तालुक्यातील हजारो मजूर काम करीत असल्याने मजुरांना रोजगार देण्याचे चांगले काम या तालुक्यात झाले़ पण या रोजगार हमीच्या कामावर बोगस मजुरांचा भरणा केल्याची धक्कादायक बाब ‘लोकमत’ने सर्वांसमोर आणली होती़ याबाबत रोजगार हमी योजनेच्या कामात बोगस मजुरासंदर्भात तसेच अनियमित कामांचा प्रश्न ‘लोकमत’ने ऐरणीवर घेतला होता़ या कामावर महिलेची प्रसुती झाल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी त्या महिलेचे नाव रोजगार हमी योजनेतील मजुराच्या यादीत समावेश असल्याचे निदर्शनास आणले़ असे अनेक प्रकरणे वृत्तपत्रातून छापून आल्याने जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी याबाबत उपजिल्हाधिकारी डॉ़ अनंत गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नियुक्त केली़ या चौकशी समितीत पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ संजय तुबाकले, रोजगार हमी योजनेचे गटविकास अधिकारी शिवराज केंद्रे यांच्यासह काही सदस्यांचा समावेश करण्यात आला़ त्यांनी औसा तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामात झालेल्या अनियमिततेच्या कामाची चौकशी करुन त्याचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या़ (प्रतिनिधी)
चौकशी समितीचे काम पूर्ण झाले आहे़ अन्य दैनंदिन कामांसोबतच चौकशीचे काम पूर्ण करावे लागले़ त्यासोबतच अहवालाचेही काम सुरु आहे़ अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे़ दीपावलीच्या सुट्ट्या असल्यामुळे अहवाल सादर केला नव्हता़ या सुट्ट्या संपताच जिल्हाधिकाऱ्यांकडे हा अहवाल सादर केला जाईल, असे चौकशी समितीचे सदस्य तथा रोजगार हमी योजनेचे गटविकास अधिकारी शिवराज केंद्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या, झालेली कामे, त्यावर असलेले मजूर यांची चौकशी समितीने चौकशी केली आहे़ त्याचा अहवाल आता सिल करण्यात आला असून, तो अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे येत्या सोमवारपर्यंत सादर केला जाणार असल्याचेही केंद्रे म्हणाले़