विहिरी, तलाव कोरडेठाक, जोरदार पावसाची प्रतीक्षा
By Admin | Updated: July 14, 2014 01:01 IST2014-07-13T23:24:48+5:302014-07-14T01:01:48+5:30
केदारखेडा : केदारखेडा व परिसरात अद्याप एकही जोरदार पाऊस झालेला नसल्याने परिसरातील तलाव, विहिरींची पाणी पातळी वाढलेली नाही़

विहिरी, तलाव कोरडेठाक, जोरदार पावसाची प्रतीक्षा
केदारखेडा : केदारखेडा व परिसरात अद्याप एकही जोरदार पाऊस झालेला नसल्याने परिसरातील तलाव, विहिरींची पाणी पातळी वाढलेली नाही़ पावसाळा सुरु होऊन महिना उलटला असला तरी परिसरातील तलाव, विहिरी अद्यापही कोरड्याठाक आहेत़ गतवर्र्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच रोहिणी नक्षत्राचा पाऊस पडला. या पावसामुळे पूर्णा नदीला एक पूरही गेला होता.
यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला होता़ कारण गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जवळपास सर्व सार्वजनिक विहिरी नदीपात्रात आहेत. या विहिरींची पाणी पातळी चांगल्या प्रमाणात वाढलेली होती़ यावर्षीच्या नुकत्याच झालेल्या पाण्याने सध्या तरी जनावरांची व ग्रामस्थांची पाणी समस्या सुटली आहे़ परंतु पावसाळ्यानंतर बारामाही पाण्यासाठी तलाव, शेतातील विहिरींची पाणी पातळी वाढण्याची गरज आहे़ त्यासाठी जोरदार पावसाची नितांत गरज असल्याचे शेतकरी बोलत आहेत. यावर्षी जून महिन्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वात जास्त पिण्याच्या पाण्याचे हाल ग्रामस्थांचे झाले़. यावर्षी पाऊस न झाल्याने पिण्याची तीव्र टंचाई सुरु झाली आहे. जनावरांचेही पाण्यावाचून हाल होत आहेत. जंगलातील वन्य प्राण्यांचेही पाण्याअभावी हाल होत आहेत. चांगला पाऊस पडेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. तीही फोल ठरली आहे. पावसाच्या आशेवर करण्यात आलेली पेरणी पूर्णपणे वाया जाण्याची भीती आहे. काही ठिकाणी कोवळी पिके जळण्यास सुरुवात झाली आहे.
पावसाने ओढ दिल्याने ग्रामीण भागातील आर्थिक गणित कोलमडण्याची चिन्हे आहेत. बाजारात शांतता आहे. शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. खरिपात महत्त्वाचे असलेल्या कपाशी, मका, सोयाबीन आदी पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केली असली तरी या पिकांचे अंकुर फुटत आहेत. गतवर्षी पडलेल्या चांगला पाऊस पडला. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या क्षेत्रावर कपाशीची लागवड केली. काही शेतकऱ्यांनी मोठी आर्थिक गुंतवणूक करीत ठिबकसंच घेतले. पाऊस न झाल्याने उपलब्ध पाणीसाठाही आता आटत आहे. आठवडी बाजार शांतता- ग्रामीण भागातील अर्थ व्यवहाराचे प्रमुख केंद्र असलेले आठवडी बाजार गत दोन ते तीन महिन्यांपासून शांतच आहे. पाऊस न पडल्याने बाजारातील उलाढाल कमालीची मंदावली आहे. (वार्ताहर)
महिनाभरात जेमतेमच पाऊस
पावसाळा सुरू होऊन जवळपास महिना उलटला आहे़ मात्र जोरदार पावसाचे आगमन चार ते पाच दिवस मिळून एकदा होत असल्याने यावर्षीची पिकांचे उत्पनाविषयी शेतकऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ यामुळे रबी पिकांचे क्षेत्र देखील धोकयात येण्याचे संकेत दिसू लागले आहेत.आता पडलेल्या पावसावरच रबी पिकांचे भवितव्य अवलंबून असते़ मात्र सध्या या पिकांसाठी सुध्दा जोरदार पावसाची नितांत गरज असल्याचे जाणकार शेतकऱ्यांतून बोलले जात आहे़