सुशिक्षीत बेरोजगारांची फौज!
By Admin | Updated: November 13, 2014 00:50 IST2014-11-13T00:38:10+5:302014-11-13T00:50:15+5:30
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेंतर्गत रिक्त असलेल्या शिपाई पदाच्या ५० जागांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे

सुशिक्षीत बेरोजगारांची फौज!
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेंतर्गत रिक्त असलेल्या शिपाई पदाच्या ५० जागांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे.सुशिक्षीत बेरोजगारांच्या संख्येमध्ये वर्षागणिक भर पडत असल्याने या पदासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. तब्बल १३ हजार १८६ जणांनी अर्ज केले आहेत. चौथी पास ही शैक्षणिक पात्रता असली तरी यासाठी ‘डीएड’, ‘बीएड’, ‘एमए’, ‘बीए’ अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनीही अर्ज केले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेला उच्च शिक्षीत शिपाई मिळणार आहेत.
सुशिक्षीत बेरोजगारांची संख्या वर्षागणिक फुगत आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये जीवघेणी स्पर्धा निर्माण झाल्यामुळे एखादा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळेल याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळेच शिपाई पदासाठीची शैक्षणिक पात्रता चौथी पास इतकी असली तरी जिल्हा परिषदेकडे केलेल्या अर्जधारकांपैकी अनेक जण उच्च शिक्षीत असल्याचे पहावयास मिळते. मागील काही वर्षामध्ये जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरु लागली आहे. त्यामुळे शिक्षक भरतीही ठप्प झाली आहे. परिणामी ‘डीएड’ हा अभ्यासक्रम पूर्ण करुनही नोकरी मिळत नसल्याने सदरील अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी आता मिळेल तो ‘जॉब’ स्वीकारताना दिसत आहेत.
गतवर्षीही शिपाई पदाच्या १११ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात आली. उपरोक्त जागांसाठी तब्बल २३ हजार जणांनी अर्ज केले होते. यामध्येही अनेकजण उच्च शिक्षीत होते. पात्र उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर यामध्ये बहुतांशजण हे डीएड, बीएड, एमए अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार असल्याचे दिसून आले. यावेळीही काही वेगळी परिस्थिती नाही. एकूण ५० जागांसाठी १३ हजार १८६ जणांनी अर्ज दाखल केला आहे. यामध्येही उच्च शिक्षित उमेदवारांची संख्या मोठी असल्याचे जिल्हा परिषद सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे याहीवेळी जिल्हा परिषदेला शिपाई म्हणून उच्चशिक्षित उमेदवार मिळू शकतात. (प्रतिनिधी)
शिपाई पदाच्या ५० जागांसाठी १३ हजार १८६ अर्ज आले आहेत. उमेदवारांची संख्या लक्षात घेता, उस्मानाबाद शहरामध्ये ३० परीक्षा केंद्र निर्माण करण्यात आली आहेत. परिक्षेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले. परिक्षेसाठी दोन ते अडीच हजार कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असल्याचेही नमूद करण्यात आले.
पहिली पायरी म्हणून...
४शासकीय नोकरीसाठी सध्या चढाओढ आहे. एकेका जागेसाठी हजारोच्या संख्येने अर्ज येत आहेत. शिपाई पदासाठी शैक्षणिक पात्रता चौथी पास इतकी असली तरी अर्ज करणाऱ्यांपैकी बहुतांश जण हे उच्चशिक्षित असल्याचे दिसून येते. शिपाई पदाची नोेकरी मिळाल्यानंतर ही मंडळी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विभागांतर्गत पदोन्नतीसाठी पात्र ठरतात. एकूणच उच्चशिक्षित मंडळी शिपाई पदाच्या माध्यमातून शासकीय सेवेत प्रवेश करतात. याला ते पहिली पायरी मानतात.