बाप्पांचे उत्साहात स्वागत
By Admin | Updated: August 30, 2014 00:03 IST2014-08-29T23:59:57+5:302014-08-30T00:03:18+5:30
गणेश मंडळांनी दुपारनंतर मिरवणुकांना प्रारंभ केला होता. सगळीकडे उत्सवाचे उत्साही वातावरण होते.

बाप्पांचे उत्साहात स्वागत
हिंगोली : जिल्ह्यात आज गणरायाच्या आगमनाची तयारी सकाळपासूनच सुरू असल्याचे चित्र होते. लहान गणेश मंडळांनी सकाळीच मूर्ती आणून सजावटीचे कामे सुरू केली होती. तर मोठ्या गणेश मंडळांनी दुपारनंतर मिरवणुकांना प्रारंभ केला होता. सगळीकडे उत्सवाचे उत्साही वातावरण होते.
गणेश स्थापनेनिमित्त शासकीय सुट्टी असल्याने सकाळपासूनच गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांची लगबग सुरू होती. सजावटीच्या कामांना गती आली होती. मूर्ती स्थापनेनंतर जी कामे करता येणार नाहीत. ती पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू असल्याचे दिसत होते. तसेच लहान गणेश मंडळांनी तर थेट मूर्तीच आणल्याचे दिसत होते.
गांधी चौक भागातही यानिमित्त मोठी गर्दी होती. सजावटीचे साहित्य, हार, मखर तसेच घरगुती गणेश स्थापनेसाठी मूर्ती व साहित्य खरेदी करताना नागरिक दिसत होते.
दुपारनंतर हळूहळू मोठ्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मूर्ती आणण्यासाठी बाहेर पडण्यास प्रारंभ केला. ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत कार्यकर्ते गांधी चौक भागातून मिरवणुकीने मूर्ती नेताना दिसत होते.
सायंकाळी उशिरा या प्रक्रियेला वेग आला. गांधी चौकाला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांवर मोठी गर्दी झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. मिरवणुकांमुळे यात भर पडून कोंडी वाढतच होती.
जिल्ह्यात जवळपास १0६३ गणेश मंडळे असून या सर्वांनी अधिकृत नोंदणी करून गणेश स्थापना केली आहे. पोलिसांनीही चोख पोलिस बंदोबस्त ठेवला असून पुढील नियोजन केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)