मराठा आरक्षणाचे स्वागत
By Admin | Updated: June 27, 2014 00:07 IST2014-06-26T23:31:20+5:302014-06-27T00:07:40+5:30
परभणी : महाराष्ट्र शासनाने मराठा आणि मुस्लिम समाजाला दिलेल्या आरक्षणाचे परभणीत विविध संघटनांच्या वतीने स्वागत करण्यात आले.

मराठा आरक्षणाचे स्वागत
परभणी : महाराष्ट्र शासनाने मराठा आणि मुस्लिम समाजाला दिलेल्या आरक्षणाचे परभणीत विविध संघटनांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
अभिनंदनीय निर्णय
मराठा व मुस्लिम समाजाला दिलेल्या आरक्षणाचे राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मोरे यांनी स्वागत केले आहे. आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षण देण्याची मागणी मराठा आणि मुस्लिम समाजाने केली होती. शासनाच्या निर्णयामुळे राजर्षी शाहु महाराजांचे स्वप्न साकार झाल्याचे मत चंद्रकांत मोरे यांनी व्यक्त केले.
युवक काँग्रेस
राज्यमंत्री मंडळाने मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षणाची घोषणा केली आहे. या निर्णयाचे युवक काँग्रेसचे सचिव इरफान मलीक यांनी स्वागत केले आहे. आरक्षणासोबतच केंद्र व राज्य सरकारमध्ये नोकऱ्यांसाठी मुस्लिम उमेदवारांची वयोमर्यादा अनुसूचित जाती व जमातीच्या धर्तीवर ३३ ऐवजी ३५ करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निर्णयाचे स्वागत
मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्याच्या निर्णयाचे परभणीत पेढे वाटून स्वागत करण्यात आले. जुना पेडगाव रोड येथील शिवाजी कॉर्नर येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणासाठी मोठा संघर्ष करण्यात आला. परभणी जिल्ह्यात अतिष गरड यांच्या नेतृत्वाखाली गावोगावी मराठा आरक्षण जनजागरण मोहीम, इशारा परिषद, महामेळावा, निदर्शने आदी आंदोलने करण्यात आली होती. या आंदोलनाला यश मिळाले आहे. या आनंदोत्सवाप्रसंगी रमण मोरे, महेश जाधव, श्याम कदम, अविनाश भालेराव, अनिल प्रधान, गणेश चव्हाण, आकाश डोंबे, निखील केशेवार, अर्जून रणेर, शुभम देशमुख, सुनिल मोरे, साईनाथ गरड, अनिल धरपडे, विकास वाघमोरे आदींची उपस्थिती होती.
छावाकडून फटाके फोडले
मराठा आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर अ. भा. छावा संघटनेच्या वतीने २६ जून रोजी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
आरक्षणासाठी छावाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जावळे पाटील यांनी १० वर्षाहून अधिक काळ आंदोलने केली. त्यांच्यानंतर नानासाहेब जावळे पाटील, विजयराव घाटगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने झाली. या आंदोलनांना यश प्राप्त झाले आहे. आनंदोत्सव कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष गोविंदराव मुळे, मराठा सेवासंघाचे प्रा. अनंतराव शिंदे, रामदास अवचार, छत्रपती शिंदे, अशोक भिसे, भागवत बर्वे, अॅड. आनंद सूर्यवंशी, प्रसाद बोराडे, शेषराव मोहिते, उद्धव पवार, नंदू कदम, विठ्ठल सूर्यवंशी, अवधूत मुळे, सदाशीव कदम, विश्वंभर बर्वे आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
शाहू महाराजांना अभिवादन
मराठा, मुस्लिम समाजाला आरक्षण देऊन त्यांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण होईल, असे प्रतिपादन करुन आरक्षणाचा निर्णय म्हणजे दुर्बलांना न्याय देण्याचे पाऊल असल्याचे मत मराठा समन्वय समितीचे मराठवाडा अध्यक्ष धाराजी भूसारे यांनी व्यक्त केले. २६ जून रोजी छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. भुसारे म्हणाले, विविध संघटनांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यासाठी आंदोलने केली होती. या दबावामुळेच आरक्षण जाहीर झाले आहे. हे क्रांतीकारी पाऊल म्हणजे छत्रपती शाहु महाराजांना अभिवादन असून महाराजांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण होईल, असे प्रतिपादन भूसारे यांनी केले. उद्घाटन प्रा.मिलिंद जाधव यांनी केले. गणेश शेळके यांनी नियोजित कार्यक्रमाची माहिती दिली. सूत्रसंचालन मेघना जाधव यांनी केले. नागोराव जाधव यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी संजय गाडगे, बाळासाहेब जाधव, विनायक विखे यांनी परिश्रम घेतले.
मराठा सेवा संघ
मराठा आरक्षण जाहीर केल्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. दिलीप मोरे, जिल्हा सचिव प्रकाश जाधव, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष दयानंद जाधव, जिजाऊ बिग्रेडच्या जिल्हाध्यक्षा रुख्मिणीताई जाधव, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष नितीन जाधव, उपाध्यक्ष रामेश्वर आवरगंड, शहराध्यक्ष बालाजी मोहिते यांची उपस्थिती होती. प्रा. दिलीप मोरे म्हणाले, मराठा सेवा संघ व आदी संघटनांच्या वतीने आंदोलनामुळे मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण जाहीर झाले असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
संभाजी ब्रिगेडच्या प्रयत्नाला यश
महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात १६ टक्के आरक्षण दिले आहे. संभाजी ब्रिगेडच्या लढ्याचे हे यश असून संभाजी ब्रिगेड या निर्णयाचे स्वागत करीत आहे, असे जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, मराठा समाजाचा ओबीेसी प्रवर्गात समावेश करावा, ही संभाजी ब्रिगेडची मूळ मागणी आहे. आरक्षणासाठी संभाजी ब्रिगेडने अनेक आंदोलने केली. त्यामुळे केंद्रात सुद्धा मराठ्यांना आरक्षणाच्या सवलती मिळाल्या पाहिजेत, या मागणीसाठी आरक्षणाचा कायदेशीर लढा सुरु ठेवणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.