नळदुर्गकरांना भारनियमनाचे चटके
By Admin | Updated: September 24, 2014 00:45 IST2014-09-24T00:30:23+5:302014-09-24T00:45:20+5:30
नळदुर्ग : विद्युत वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे नळदुर्ग शहराचा वसूलीचा दर्जा जी-३ मध्ये तर विद्युत गळती ७४.०७ टक्के पर्यंत पोहचल्याने शहरात

नळदुर्गकरांना भारनियमनाचे चटके
नळदुर्ग : विद्युत वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे नळदुर्ग शहराचा वसूलीचा दर्जा जी-३ मध्ये तर विद्युत गळती ७४.०७ टक्के पर्यंत पोहचल्याने शहरात दररोज सव्वा नऊ तास भारनियमन होत सुरु झाले आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्यांतून संताप व्यक्त होत आहे.
येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रातून नळदुर्ग अर्बनसह साखर कारखाना, वसंतनगर, चिकुंद्रा व मानेवाडी आदी गावांना विद्युत पुरवठा होतो. मागच्या तीन-चार महिन्यापासून विद्युत वितरणातील गळतीने ७४.०७ टक्के चा उच्चांक गाठला आहे. तर वसुली केवळ ४० टक्के झालेली आहे. या कारभारामुळे जिल्हा कार्यकारी अभियंत्याने नळदुर्ग शहरात १४ सप्टेंबरपासून सकाळी ५.३० ते ८.३० (३ तास), सकाळी ११.३० ते दुपारी २.४५ (३.१५ तास) तर सायंकाळी ७ ते रात्री १० (३ तास) असे भारनियमन करण्याचे आदेश दिल्याने मंगळवारपासून भारनियमनास प्रारंभ झालेला आहे.
मिटर रिडींगप्रमाणे बिल न देणे, सार्वजनिक उत्सव व सणात विद्युत चोरीकडे दुर्लक्ष करणे, अनधिकृत कर्मचारी व अनधिकृत विद्युत पुरवठा यामुळे या उपकेंद्राच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बिलावर फोटो मिटरचा असतो, रिडींगमध्ये युनिटऐवजी दिनांक दिसतो. असे असतानाही वापर युनिट लिहून बिल दिले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. ग्राहकांच्या तक्रारीचा निपटाराही वेळेवर होत नसल्याने ग्राहक बिल भरत नाहीत. या सर्वच परिस्थितीत नियमित बिल भरणा करणारा मात्र संकटात सापडला आहे. याशिवाय वितरण कंपनी गळतीची तुट भरुन काढण्यासाठी ज्यादा बिल आकारणी करीत असल्याची ओरडही ग्राहकातून वाढत आहे. दिवसा ९ तासाचे विद्युत भारनियमन झाल्यास लघु उद्योजकांना दिवसभर रिकामे बसून रहावे लागणार आहे. शहरात अनेक शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामुळे विद्युत भार नियमनाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होणार आहे.
याशिवाय सेतू कार्यालय, बँका, पोस्ट आॅफीस, महाविद्यालये यांचा कारभार बहुतांश आॅनलाईन आहे. विविध स्पर्धा परीक्षांचे फॉर्म कर्मचाऱ्यांच्या पगाराची माहितीही आॅनलाईन द्यावी लागते. अशा परिस्थितीत ९ तास भारनियमन झाल्यास सर्व स्तरातील नागरिकांची होरपळ होणार आहे. संबंधितांनी शहराचे भारनियमन रद्द करुन भोंगळ कारभार सुधारावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. (वार्ताहर)