१२ किलोचा जिवंत तोफगोळा
By Admin | Updated: September 4, 2015 00:39 IST2015-09-04T00:36:59+5:302015-09-04T00:39:19+5:30
नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी परिसरातील एका पुरातन विहिरीत तब्बल १२ किलो वजनाचा जिवंत तोफगोळा आढळल्याने एकच खळबळ उडाली

१२ किलोचा जिवंत तोफगोळा
नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी परिसरातील एका पुरातन विहिरीत तब्बल १२ किलो वजनाचा जिवंत तोफगोळा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे़ घटनास्थळी दाखल झालेल्या बॉम्ब शोधक-नाशक पथकाने धाव घेवून सदरील तोफगोळा ताब्यात घेतला आहे़ तो ५० टक्क्याहून अधिक जिवंत असल्याचा अंदाज असून, विहिरीत इतर स्फोटके आहेत का ? याची तपासणी करण्यात येत आहे़
नळदुर्ग शहरापासून सहा किलोमीटर अंतरावरील खुदावाडी शिवारात शरद गणपतराव नरवडे यांची सर्वे नंबर १६९ मध्ये शेती आहे़ या शेतातील जुन्या विहिरीतील गाळ काढण्याचे काम गुरूवारी सुरू होते़ गाळ काढताना दुपारच्या सुमारास ९ इंच लांबीचा व ३ इंच व्यासाचा १२ किलोचा तोफगोळा दिसून आला़ प्रारंभी बॉम्ब असल्याच्या अफवेने खुदावाडीसह परिसरात मोठी खळबळ उडाली होती़ घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सपोनि फुलचंद मेंगडे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळाकडे धाव घेतली़ तोफगोळ्याची पाहणी केल्यानंतर वरिष्ठांशी संपर्क साधून बॉम्ब शोधक-नाशक पथकाला पाचरण केले़ दुपारी ४़३० वाजण्याच्या सुमारास दाखल झालेल्या पथकाने श्वानासह परिसराची पाहणी केली़ तोफगोळ्याची हाताळणी केली असता तो जिवंत असल्याचे दिसून आले़ जिवंत तोफगोळा असल्याचे समजताच महसूलचे नायब तहसीलदार माणिक चव्हाण, मंडळ अधिकारी गांदले यांनी धाव घेवून पंचनामा केला़ दरम्यान, या तोफगोळ्याचा स्फोट झाला असता तर साधारणत: अर्धा किलोमीटर अंतरावर मोठे नुकसान झाले असते, असा तज्ञांचा अंदाज आहे़ तर हा तोफगोळा कोणाच्या तरी हाती लागल्यानंतर या विहिरीत आणून टाकल्याची चर्चाही रंगली आहे़
नळदुर्ग येथील निजामकालीन किल्ल्यातून शत्रूवर त्या काळात तोफेतून हल्ला करण्यात आल्यानंतर न फुटलेला हा तोफगोळा असावा, असा कयास लावला जात आहे़ या तोफगोळ्यात जवळपास पाच ते सहा किलोचे स्फोटके असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे़
नागरिकांनी घाबरू नये
याबाबत बोलताना सपोनि एस़डी़पठाण म्हणाले, तोफगोळ्याबाबत नागरिकांनी घाबरून जाण्यासारखे नाही़ ६०० ते ८०० मीटर वेगाची वस्तू आदळली तरच याचा स्फोट होवू शकतो़ त्याची हाताळणी बॉम्ब शोधक-नाशक पथकाने केली असून, त्याचा स्फोट होणार नाही, असेही पठाण म्हणाले़
गाळ काढण्यास प्रतिबंध
सपोनि फुलचंद मेंगडे म्हणाले, महसूल विभागाच्या परवानगीने सापडलेला तोफगोळा सदृश्य वस्तू बॉम्ब शोधक-नाशक पथकाच्या ताब्यात देण्यात आली आहे़ त्या विहिरीत इतर काही स्फोटके आहेत का ? याची तपासणी केली जात असून, काही काळापुरते गाळ उपसा करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे़