आठवडी बाजाराचे ग्रहण सुटेना !
By Admin | Updated: August 2, 2014 01:48 IST2014-08-02T01:14:59+5:302014-08-02T01:48:56+5:30
माजलगाव : शहरातील आठवडी बाजार भरत असलेल्या सध्याच्या जागेवरून तो हटवून दुसरीकडे भरवावा हा न्यायालयाने एक वर्षापूर्वी आदेश दिलेला आहे.

आठवडी बाजाराचे ग्रहण सुटेना !
माजलगाव : शहरातील आठवडी बाजार भरत असलेल्या सध्याच्या जागेवरून तो हटवून दुसरीकडे भरवावा हा न्यायालयाने एक वर्षापूर्वी आदेश दिलेला आहे. तो अद्यापही हटविला नाही. २० जुलै रोजी जाहीर प्रगटनाद्वारे बाजार हटविण्यात येणार असल्याचे सांगूनही न.प.ने बाजार हटविलेला नाही. मुख्याधिकाऱ्यांनी शेतकरी व न्यायालयाची दिशाभूल केली. आठवड्यातून दोनदा भरणाऱ्या बाजाराचे न.प.च्या चुकीमुळे ग्रहण सुटेनासे झाले आहे.
माजलगाव शहरात आठवड्यातून दोनदा बाजार भरविला जातो. वीस वर्षांपूर्वी हा बाजार हनुमान चौकाजवळ भरविण्यात येत होता. मात्र या ठिकाणी जागा पुरत नसल्याने हा बाजार गजानन मंदिर रोडवर भरविण्यात येऊ लागला. या बाजारामुळे परिसरातील नागरिकांना अडथळा निर्माण होत आहे. या बाजार रस्त्यावर अनेक शासकीय कार्यालयांचा संपर्क येतो. त्यामुळे येथून वाहनांसह सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रहदारीच्या रस्त्यावरच बाजार भरविण्यात येत असल्याने वाहतूक कोंडी होत होती. सध्याच्या ठिकाणी न.प.कडून कुठल्याही सुविधा पुरविल्या जात नाहीत. याचा त्रास व्यापारी व शेतकऱ्यांना होत आहे. हा बाजार हटविण्या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते जगदीश साखरे यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने हा बाजार हटवावा, असे एक वर्षापूर्वी न.प.ला आदेश दिले होते. मात्र मुख्याधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखविली.
न.प.ने दिशाभूल केली म्हणून १६ जुलै रोजी न्यायालयाकडे साखरे यांनी अटक वॉरंट काढावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर २० जुलै रोजी वर्तमानपत्रातून जाहीर प्रगटन देण्यात आले. २७ जुलैला सर्व्हे नं. ३८० मधील जागेत बाजार भरणार असल्याचे नमुद केले होते. मात्र अद्यापही बाजार भरविण्यात आलेला नाही.
प्रभारी मुख्याधिकारी अब्दुल सत्तार म्हणाले, न.प.ने जाहीर प्रगटन दिले होते. व्यापारी व शेतकरी सर्व्हे नं.३८० मध्ये २७ जुलैला आले नाहीत. येत्या रविवारी पोलीस बंदोबस्तात हा बाजार हटविण्यात येईल. (वार्ताहर)