वेबसाइटवर विक्रीकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:05 IST2017-08-17T01:05:30+5:302017-08-17T01:05:30+5:30
वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू होऊन महिना उलटला; पण अजूनही राज्य वस्तू व सेवाकर विभागाचे नाव विक्रीकर विभागच आहे

वेबसाइटवर विक्रीकरच
प्रशांत तेलवाडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू होऊन महिना उलटला; पण अजूनही राज्य वस्तू व सेवाकर विभागाचे नाव विक्रीकर विभागच आहे. १ जुलै रोजी रेल्वेस्टेशनसमोरील विक्रीकर भवनच्या इमारतीची पाटी बदलून तिथे राज्य वस्तू व सेवाकर भवन असा नवीन फलक लावण्यात आला; पण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर अजूनही ‘डिपार्टमेंट आॅफ सेलटॅक्स’ हेच नाव आहे.
केंद्र सरकार ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमावर भर देत आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती करीत आहे, पण याला ‘खो’ देण्याचे काम विभागातर्फे करण्यात येत आहे. ‘सरकारी काम, महिनाभर थांब’ या उक्तीला साजेसे काम सरकारी विभागातर्फे नेहमीच होत असते, याची प्रचीती यानिमित्ताने येत आहे. वेबसाइट सतत अद्ययावत करण्याचे काम मुंबईतून केले जाते. हे काम ज्यांना देण्यात आले त्यांचीही ‘सरकारी कामाची’ सवय अजून गेली नाही, हेच यावरून सिद्धहोते.
एवढेच नव्हे, तर जीएसटी विभागाच्या सहआयुक्त दीपा मुधोळ-मुंडे या रुजू होऊन पाच महिने झाले, पण अजूनही वेबसाइटवर सहआयुक्त म्हणून डी.एम. मुगळीकर यांचेच नाव
आहे. नवीन सहआयुक्तांचे नाव टाकण्यासही संबंधितांना वेळ मिळाला नाही; मात्र जीएसटीविषयीची माहिती या वेबसाइटवर अपडेट केली जात आहे, हे विशेष.केंद्र सरकारच्या (सीजीएसटी विभागाच्या) वेबसाइटवर ‘गुडस् अॅण्ड सर्व्हिस टॅक्स (जीएसटी) कमिशनरेट, औरंगाबाद’ असे नाव बदलण्यात आले आहे. १ जुलैआधी या विभागाचे नाव ‘केंद्र उत्पादन शुल्क व सीमाशुल्क विभाग’ (सीबीईसी) असे होते. मात्र जीएसटी लागू होताच या विभागाच्या वेबसाइटवरील नावात लगेच बदल करण्यात आला. त्या धर्तीवर राज्य जीएसटी विभागाच्या वेबसाइटवरील नावही बदलणे आवश्यक होते.