निवडणुकीमुळे शस्त्रे 'म्यान' !
By Admin | Updated: September 16, 2014 01:33 IST2014-09-16T00:27:42+5:302014-09-16T01:33:33+5:30
बीड : महाराष्ट्र विधानसभा सर्वात्रिक निवडणुकांसाठीची आदर्श आचारसंहिता १२ सप्टेंबरपासून लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शस्त्र बाळगण्यास निर्बंध घातले

निवडणुकीमुळे शस्त्रे 'म्यान' !
बीड : महाराष्ट्र विधानसभा सर्वात्रिक निवडणुकांसाठीची आदर्श आचारसंहिता १२ सप्टेंबरपासून लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शस्त्र बाळगण्यास निर्बंध घातले असून शस्त्र परवानाधारकांनी संबंधित पोलीस ठाण्यात शस्त्रे जमा करण्याचे आदेश नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
सार्वत्रिक निवडणुक व बीड लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.सदर निवडणुका शांततेत, निर्भयपणे व खुल्या वातावरणात पार पाडण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे आचारसंहिता लागू झालेल्या दिनांकापासून शस्त्रे बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.
निवडणूक काळात शस्त्रांचा गैरवापर केला जाऊ शकतो. या अनुषंगाने या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात १ हजार ४१५ परवाना धारक आहेत. संपूर्ण जिल्ह्यातील सदर निवडणुकांचा प्रभाव असलेल्या क्षेत्रातील शस्त्र परवानाधारकांची शस्त्रे निवडणूक आचारसंहिता कालावधीसाठी जमा करुन घेणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी शस्त्रे जमा करुन घ्यावीत असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
बँक, संस्था, विद्युत केंद्र व इतर महत्त्वाच्या कार्यालयाच्या सुरक्षेसाठी देण्यात आलेल्या परवान्यावरील शस्त्रे वगळता इतर सर्वांना संबंधीत पोलीस ठाण्यात शस्त्रे जमा करावी लागणार आहेत. आचारसंहिता संपल्यानंतर शस्त्रे परत देण्यात येणार आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकारी राम यांनी अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांना सदरील आदेश दिले असून तात्काळ कार्यवाही करण्याचे सांगितले आहे. कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा लागणार आहे. जे परवानाधारक संबंधित पोलीस ठाण्यास शस्त्रे जमा करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होणार आहे. पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी संबंधित ठाणे प्रमुखांना याबाबत सोमवारी सांयकाळी सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)