अतिक्रमणधारकांवर यापुढेही कारवाई करू
By Admin | Updated: August 22, 2014 00:58 IST2014-08-22T00:52:23+5:302014-08-22T00:58:22+5:30
तुळजापूर : कोणत्याही व्यापाऱ्यास अथवा वाहनधारकास त्रास देण्याचा प्रशासनाचा हेतू नाही. परंतु जे व्यापारी, वाहनधारक कायद्याचे उल्लंघन करून दुकानासमोर अतिक्रमण

अतिक्रमणधारकांवर यापुढेही कारवाई करू
तुळजापूर : कोणत्याही व्यापाऱ्यास अथवा वाहनधारकास त्रास देण्याचा प्रशासनाचा हेतू नाही. परंतु जे व्यापारी, वाहनधारक कायद्याचे उल्लंघन करून दुकानासमोर अतिक्रमण अथवा अडथळा निर्माण करतील, त्यांच्यावर यापुढेही नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिला.
बुधवारी येथील सर्किट हाऊसवर जिल्हाधिकारी, न.प. प्रशासन व व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. नवरात्रोत्सवात भाविकांच्या गर्दीमुळे व्यापाऱ्यांना साहित्य भरणे अवघड जाते. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी कमी गर्दीच्या वेळी चार-पाच वाहनांद्वारे व्यापाऱ्यांच्या दुकानापर्यंत माल आणण्यासाठी परवानगी दिली जाईल, यासाठी बारगेटींग करण्यात येईल. दुकानासमोर साहित्य मांडण्यासाठी एक मीटर जागेची परवानगी द्यावी, अशी विनंती व्यापाऱ्यांनी यावेळी डॉ. नारनवरे यांनी केली.
यावेळी जिल्हाधिकारी नारनवरे म्हणाले की, दुकानदारांनी अगोदरच दुकानाचे बांधकाम वाढविले आहे. त्यामुळे अशी अधिकची जागा कोणालाही देता येणार नाही. याउपर कोणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर संबंधितावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले. बैठकीस तहसीलदार काशीनाथ पाटील, पोनि ज्ञानोबा मुंडे, मुख्याधिकारी राजीव बुबणे, व्यवस्थापकीय तहसीलदार सुजीत नरहरे, मंदिर कर्मचारी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष समाधान कदम, नगरसेवक दयानंद हिबारे, सचिन अग्रवाल, विश्वजित पाटील, बालाजी भालेकर, शिवाजी बोधले, राहुल साठे, इंद्रजित साळुंके, बबलू रोकडे, मनु अग्रवाल इ. व्यापारी या बैठकीस उपस्थित होते. (वार्ताहर)
गणेश वर्गणी मागताना ज्या मंडळाकडून सक्ती केली जाईल, त्या मंडळावर कायदेशीर कारवाई करावी, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी पोलीस निरीक्षक ज्ञानोबा मुंडे यांना दिले. मंडळानीही वर्गणीसाठी कोणाला सक्ती, धाकदपटशा करु नये असे आवाहन त्यांनी केले. गणेशोत्सव उत्साही वातावरणात आणि शांततेत पार पडावा, याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले. नवरात्र काळात पायी येणाऱ्या भाविकांना त्रास होवू नये म्हणून व्हीआयपीची वाहने दिपक चौकापर्यंत आणण्याच्या सूचनेचा विचार करू, असे जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना सांगितले.