आम्हीही बाबांसारखेच पोलीस, डॉक्टर होणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:05 IST2021-05-18T04:05:22+5:302021-05-18T04:05:22+5:30
कोरोनामुळे सर्वसामान्य लोकांना घराबाहेर पडण्याची भीती वाटते आहे. पण पोलीस, डॉक्टर आणि इतर कोरोना योध्द्यांना मात्र जीव ...

आम्हीही बाबांसारखेच पोलीस, डॉक्टर होणार !
कोरोनामुळे सर्वसामान्य लोकांना घराबाहेर पडण्याची भीती वाटते आहे. पण पोलीस, डॉक्टर आणि इतर कोरोना योध्द्यांना मात्र जीव धोक्यात घालून त्यांचे कर्तव्य चोखपणे पार पाडावे लागत आहे. अनेक डॉक्टर, पोलीस आणि इतर कोरोना योध्द्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचेही वारंवार कानावर पडते. परंतु असे असले तरीही आम्हालाही भविष्यात आमच्या वडिलांसारखेच पोलीस आणि डॉक्टर व्हायला आवडेल, असे त्यांच्या पाल्यांनी धाडसाने सांगितले.
चौकट :
प्रतिक्रिया
पोलीस व्हायला आवडेल
१. मी माझ्या बाबांचे काम लहानपणापासून पाहते आहे. कोरोना आल्यामुळे ते आता त्यांच्या कामात अधिकच व्यस्त आहेत. त्यांचे काम मला खूप आवडते. त्यामुळे मला पण माझ्या बाबांसारखेच पोलीस बनायचे आहे.
- ईश्वरी रवींद्र बाहुले
२. माझे बाबा पोलीस आहेत. सध्याच्या काळात आपल्या सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी ते खूप काम करत आहेत. त्यांनी काळजी घेऊन काम करावे, असे आम्ही त्यांना नेहमी सांगतो. माझे देखील मोठेपणी पोलीस बनण्याचे स्वप्न आहे.
- श्रावणी दादासाहेब झारगड
चौकट
प्रतिक्रिया
डॉक्टर होणेही आवडेल
१. माझे बाबा डॉक्टर आहेत आणि ते अशा काळातही रोज घराबाहेर पडत आहेत. रुग्णसेवा करणे हे त्यांचे कर्तव्य असल्याने त्यांचे काम या काळात खूप वाढले आहे. डॉक्टर होणे मला आवडेल, पण शिक्षिका होण्याचे माझे स्वप्न आहे.
- तन्वी अमोल जोशी
२. मला मोठेपणी डेंटिस्ट व्हायचे आहे. कोरोना आता आहे, पण तो नंतर असणार नाही. मी मोठा झाल्यावरही कोरोना राहिला, तरी मी माझी स्वत:ची योग्य ती काळजी घेऊन माझ्या बाबांसारखाच डॉक्टर होईन.
- पार्थ नीलेश लोमटे
चौकट :
आपल्या आई-बाबांना कोरोना योद्धा असल्याने या काळातही घराबाहेर जावे लागत आहे, याचे मुलांना मानसिक दडपण येऊ शकते. भीतीही वाटू शकते. पण त्याचबरोबर याचे अनेक सकारात्मक परिणामही आहेत. आई - वडील कोरोना योद्धे असलेली बालके कोरोनापासून स्वत:चे कसे संरक्षण करायचे, हे लवकरच शिकली आणि समाजाप्रती आपले काही तरी कर्तव्य आहे, हे देखील बहुतांश बालकांनी त्यांच्या पालकांकडे पाहून आपसूकच आत्मसात केले आहे.
- डॉ. रश्मीन आचलिया
मानसोपचारतज्ज्ञ