ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांच्या आमिषापासून दूर राहणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:04 IST2021-05-15T04:04:07+5:302021-05-15T04:04:07+5:30
============= बनावट सैनिक करू शकतात फसवणूक सायबर गुन्हेगार ओएलक्स, फेसबुक अशा समाजमाध्यमावर वस्तू विक्रीसाठी ठेवतात. वस्तू ...

ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांच्या आमिषापासून दूर राहणे गरजेचे
=============
बनावट सैनिक करू शकतात फसवणूक
सायबर गुन्हेगार ओएलक्स, फेसबुक अशा समाजमाध्यमावर वस्तू विक्रीसाठी ठेवतात. वस्तू कुरिअरने पाठवितो, असे सांगून आगाऊ पैसे पाठविण्यास सांगतात. वस्तू घेणाऱ्याचा विश्वास बसावा, म्हणून ते त्यांचे बनावट ओळखपत्र, मिल्ट्री कॅंटिनचे कार्ड, स्वतः आर्मी ऑफिसर, जवान असल्याचे युनिफॉर्मवरील छायाचित्र व्हॉट्सॲपवर पाठवितात. अशा भामट्या लोकांवर विश्वास ठेवून आगाऊ पैसे पाठवू नयेत.
===================
तोतया बॅंक अधिकाऱ्यांपासून सावध राहा
बॅंकेचा अधिकारी बोलत असल्याचा फोन कॉल करून कुणी ओटीपी अथवा बॅंक खात्याविषयी माहिती विचारत असेल, तर त्यांना माहिती देऊ नका. बँकेचे अधिकारी ग्राहकाला कॉल करून त्यांच्या बॅंक खात्याविषयी माहिती विचारत नाही. ओटीपी विचारत नाही. यामुळे कुणालाही ओटीपी किंवा बॅंक खात्याची माहिती देऊ नका, ऑनलाइन फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते.
====================
सावधान हे ॲप्लिकेशन्स डाउनलोड कराल तर....
Team viewer, any Desk, TeamViewerQuicksupport आणि REMOTE IT SUPPORT यासारखे रिमोट ॲक्सेस ॲप्लिकेशन कोणाच्याही सांगण्यावरून मोबाइलमध्ये अथवा संगणकात डाउनलोड करू नका. या सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनचा गैरवापर करून सायबर गुन्हेगार फसवणूक करू शकतात. हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायला सांगून, सायबर गुन्हेगार मोबाइल अथवा संगणकाचे नियंत्रण त्यांच्याकडे घेतात. ऑनलाइन बॅंकिंगद्वारे गंडवितात अथवा अन्य महत्त्वाची माहिती ते चोरून परस्पर व्यवहार करतात, असे पोलिसाच्या तपासात अनेकदा हे उघडकीस आले आहे.
============
फेसबुकचा पासवर्ड मोबाइल क्रमांक ठेवू नका
फेसबुक या समाजमाध्यमावर खाते उघडताना पासवर्ड तुमचा मोबाइल क्रमांक ठेवू नका, शिवाय प्रोफाइल (छायाचित्र आणि वैयक्तिक माहिती) सरसकट सर्वांना पाहता येणार नाही, अशी सुरक्षित ठेवा. फेसबुकचा पासवर्डमध्ये @#$ आणि अंकाचा समावेश करावा.
अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. फेसबुकचे नियम पाळले, तर तुमच्या फेसबुक खात्यातील वैयक्तिक माहिती सायबर गुन्हेगाराला मिळणार नाही. परिणामी, फेसबुकच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळता येते.
==================
झटपट अल्पदराने कर्जाच्या मेसेजला प्रतिसाद देऊ नका
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत मोबाइलवर अनोळखी व्यक्ती मेसेज पाठवितात. यातील काही मेसेज झटपट आणि अल्पदराने नामांकित फायनान्स कंपनीचे कर्ज मिळेल, असे नमूद असते. वास्तविक, त्या संस्थेच्या नावाचा परस्पर गैरवापर करून सायबर गुन्हेगार कर्जाच्या नावाखाली ऑनलाइन गंडा घालण्यासाठी असे मेसेज पाठवितात.