‘हमे तो अपनोंने लुटा..!’
By Admin | Updated: December 28, 2016 00:02 IST2016-12-28T00:01:10+5:302016-12-28T00:02:13+5:30
बीड शेरोशायरी व ‘आँखे’ ‘गैरों पे करम, अपनोंपे सितम..’ हे गीत पेश करुन जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

‘हमे तो अपनोंने लुटा..!’
संजय तिपाले बीड
‘हमे तो अपनोने लुटा, गैरे में कहा दम था..!’ अशा एकापेक्षा एक सरस शेरोशायरी व ‘आँखे’ चित्रपटातील ‘गैरों पे करम, अपनोंपे सितम..’ हे गीत पेश करुन जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. सभापती बजरंग सोनवणे यांची कोपरखळी व जि.प. सदस्य देवीदास धस यांच्या रांगड्या भाषेतील चौफेर टोलेबाजीमुळे सभागृहात हास्याचे कारंजे उडाले अन् उपस्थितांनीही टाळ्यांच्या कडकडाटात भरभरुन दाद दिली.
निमित्त होते, जि.प. च्या आएसओ शाळा गुणगौरव कार्यक्रमाचे. मंगळवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडलेल्या सोहळ्यात राजकीय कलगीतुरा पहावयास मिळाला. कधी स्तूती तर कधी चिमटे अशा मिश्कील वातावरणात हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
जि.प. सदस्य देवीदास धस यांनी केज तालुक्यातील ३५ शाळा आएसओ होतात, मग आष्टीतील पाचच कशा? असा सवाल उपस्थित करुन सभापती बजरंग सोनवणे यांना ‘बाऊन्सर’ टाकला. मुलींचा जन्मदर घटत आहे याबद्दल चिंता व्यक्त करताना त्यांनी महिलाच महिलांच्या जीवावर उठल्या आहेत, असे नमूद केले. माझ्या मुख्याध्यापकाचे केबिन सीईओंपेक्षा सरस असल्याचे सांगून त्यांनी कोपरखळी मारली. आम्ही पाठ थोपटून घेत नाही;पण आमच्या जामगावची शाळा नंबरवन असल्याचा दावाही त्यांनी केला. शिक्षणाधिकारी हिंगोणेकर यांनी आपल्या भाषणात जामगावचा उल्लेख जामखेड केला. त्याचा खरपूस समाचार घेताना ‘त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांनाही चिमटा काढला. मुलांची सोयरीक जुळविताना व अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न सोडविताना नाकेनऊ आल्याचे सांगून त्यांनी डोक्यावरील टोपी काढून उपस्थितांना आपल्याला टक्कल पडल्याचे दाखवले. त्यांच्या भाषणाने सभागृहात हास्यकल्लोळ पसरला.
धस यांनी आष्टीला मुख्याध्यापकांच्या अनेक जागा रिक्त आहेत, त्यामुळे शाळा कशा आएसओ होतील? असा सवाल केला होता. त्याचा धागा पकडून सभापती सोनवणे म्हणाले, आपण सारी कामे नियमाला धरुन केली. अनेक शिक्षक शिफारशी घेऊन येत होते; पण आपण थारा दिला नाही. २१ मार्चपर्यंत आपल्याकडे सभापतीपद आहे. आमची बिदाई चांगली करा... असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्ष पंडित व सभापती गर्जे यांच्यात वित्त आयोगाच्या निधी वाटपावरुन गेल्याकाही दिवसांत छुपे युद्ध सुरू आहे. काही सहकाऱ्यांनी विकासात कमी - जास्त करण्याचा प्रयत्न केला; पण आपण त्यांना चाप लावण्याची भूमिका घेतली असल्याची ‘गुगली’ पंडित यांनी टाकली. गटातटाचे राजकारण आपण केले नाही. जि.प. चा प्रमुख म्हणून सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. चांगलं करता येत नसेल तर वाईटही करु नका.. असा सबुरीचा सल्ला द्यायलाही ते विसरले नाहीत. सभापती गर्जे यांचे सुरुवातीलाच संयमी भाषण झाले. एका व्यासपीठावर असूनही या दोघांनी संवाद टाळला. एकमेकांचे उणेदुणे काढतच कार्यक्रम आटोपला.