पावसाळा संपताच जिल्हा टँकरच्या वाटेवर
By Admin | Updated: October 10, 2014 00:42 IST2014-10-10T00:18:10+5:302014-10-10T00:42:27+5:30
सुनील कच्छवे, औरंगाबाद महिनाभरापूर्वीच टँकरमुक्त झालेल्या जिल्ह्याची वाटचाल पुन्हा एकदा टँकरच्या दिशेने सुरू झाली आहे. पावसाळा संपताच जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणीटंचाई जाणवू लागली आहे

पावसाळा संपताच जिल्हा टँकरच्या वाटेवर
सुनील कच्छवे, औरंगाबाद
महिनाभरापूर्वीच टँकरमुक्त झालेल्या जिल्ह्याची वाटचाल पुन्हा एकदा टँकरच्या दिशेने सुरू झाली आहे. पावसाळा संपताच जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यातून टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यास सुरुवात झाली आहे.
औरंगाबाद जिल्ह्याने गतवर्षी भीषण दुष्काळ अनुभवला. जिल्ह्यातील शेकडो गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या गावांची तहान भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर टँकर सुरू केले होते. मेअखेरीस टँकरची संख्या तीनशेच्या पुढे गेली. जून महिन्यात पाऊस पडल्यानंतर टँकर बंद होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, संपूर्ण जून महिना कोरडा गेला. त्यामुळे टँकरची संख्या आणखीनच वाढली. जुलै महिन्यातही जिल्ह्यात सुमारे अडीचशे गावांना ३३३ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. आॅगस्ट महिन्यात मात्र बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे आॅगस्टअखेरीस जिल्ह्यातील टँकर पूर्णपणे बंद झाले; परंतु त्यानंतरही पावसाची अवकृपा कायम राहिली. त्यामुळे आता पावसाळा संपल्यानंतर पुन्हा एकदा पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे तहसील कार्यालयांकडून ठिकठिकाणी टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यास सुरुवात झाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पैठण तहसील कार्यालयाकडून टँकरचे काही प्रस्ताव नुकतेच प्राप्त झाले आहेत. तालुक्यातील कमी पाऊस झालेल्या मंडळांमध्ये टंचाई जाणवत
आहे. त्यामुळे पाच गावांमध्ये पाच टँकर सुरू करावेत, अशी मागणी या प्रस्तावांतून करण्यात आली आहे.