नागपूर विशेष गाडी बंद पडण्याच्या मार्गावर
By Admin | Updated: June 27, 2017 00:24 IST2017-06-27T00:13:55+5:302017-06-27T00:24:57+5:30
नांदेड : मराठवाड्यातील खासदार आणि प्रवाशांची अनेक वर्षांपासून मुंबई आणि नागपूरसाठी स्वतंत्र गाडी सुरू करण्याची मागणी आहे़

नागपूर विशेष गाडी बंद पडण्याच्या मार्गावर
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : मराठवाड्यातील खासदार आणि प्रवाशांची अनेक वर्षांपासून मुंबई आणि नागपूरसाठी स्वतंत्र गाडी सुरू करण्याची मागणी आहे़ त्यानुसार दक्षिण मध्य रेल्वेने उन्हाळी विशेष गाडी म्हणून सुरू केलेल्या नांदेड - अजनी (नागपूर) गाडीला प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे़ त्यामुळे सदर एक्स्प्रेस नियमितपणे चालविण्याऐवजी बंद करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करीत आहे़
नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडण्याबरोबर मुंबई, पुणे आणि नागपूरसाठी नांदेड येथून स्वतंत्र गाडी सुरू करण्याची मागणी खासदार तसेच विविध प्रवासी संघटनांकडून नेहमीच होत असते़ अनेक दिवसांच्या पाठपुराव्यानंतर नवीन नांदेड -मुंबई एक्स्प्रेस सुरू करण्याच्या हालचालींना रेल्वे बोर्डाने वेग दिला आहे़ तशी माहिती नांदेड विभागाकडून मागविली जात आहे़ दरम्यान, सदर गाडीला रेल्वेमंत्री मराठवाडा दौऱ्यावर आले असता हिरवी झेंडी मिळेल, अशी अपेक्षा होती़ परंतु, विकासकामांच्या उद्घाटनाशिवाय रेल्वेमंत्र्यांनी काही विशेष भेट नांदेडसह मराठवाड्याला दिली नाही़ नव्याने सुरू होणारी नांदेड - मुंबई रेल्वे अकोलामार्गे सुरू करण्याच्या हालचालींना ब्रेक बसला आहे़ या मार्गाने गाडी मुंबईत पोहोचण्यास १६ तास लागत आहेत़ त्यामुळे सदर गाडी मनमाडमार्गेच धावणार असल्याचे दमरेचे महाव्यवस्थापक यादव यांनी नांदेड दौऱ्यात स्पष्ट केले़ मुंबई गाडी अकोलामार्गे धावणार नसली तरी अकोला, हिंगोली, वाशिम जिल्ह्णातील प्रवाशांसाठी अकोला ते पूर्णा अशी लिंक रेल्वे सुरू करण्यात येणार आहे़ सदर गाडी आठ ते दहा डब्याची राहणार असून ती पूर्णा येथून मुंबई गाडीला जोडण्यात येईल़ सदर गाडी सुरू करण्यास मध्य रेल्वेने संमती दर्शविली आहे़
नागपूरसाठी विशेष रेल्वे म्हणून सुरू केलेल्या अंजनी एक्स्प्रेसला अल्प प्रतिसाद मिळत आहे़ पूर्वी सदर गाडीला ५ ते ७ टक्के प्रवासी मिळत होते़ त्यानंतर प्रवाशांमध्ये केलेल्या जनजागृतीमुळे वाढ होवून प्रवाशांचे प्रमाण १८ टक्क्यांवर गेले आहे़ येणाऱ्या काळात ३० टक्के प्रवासी मिळाले नाहीत तर नागपूर गाडी कायमस्वरूपी बंद होऊ शकते़ त्यामुळे प्रवाशांनी नांदेड - अंजनी (नागपूर) विशेष रेल्वेने प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी केले आहे़