पाणपोई तहानलेल्या !
By Admin | Updated: April 29, 2015 00:55 IST2015-04-29T00:32:11+5:302015-04-29T00:55:00+5:30
संजय तिपाले/राजेश खराडे , बीड सामाजिक बांधिलकीचा कळवळा दाखवत विविध पक्ष, संघटना, मित्रमंडळांच्या वतीने शहरात पाणपाई सुरु केल्या.

पाणपोई तहानलेल्या !
संजय तिपाले/राजेश खराडे , बीड
सामाजिक बांधिलकीचा कळवळा दाखवत विविध पक्ष, संघटना, मित्रमंडळांच्या वतीने शहरात पाणपाई सुरु केल्या. मात्र, पाण्याअभावी काही पाणपोई कशा तहानलेल्या आहेत? हे वास्तव ‘लोकमत’च्या स्टींग आॅपरेशनमधून मंगळवारी पुढे आले. एकीकडे एप्रिल महिन्यात उन्हाने जोर धरल्यामुळे जीवाची काहिली होतेयं दुसरीकडे मात्र काही पाणपोईवर ‘एप्रिल फुल’ चा अनुभव येत आहे. मोठ्या आशेने पाणपोयांकडे वळलेली पाऊले निराश होऊन रिकाम्या हाताने परत येतात. त्यामुळे सामाजिक जाणिवांचा झरा देखील केवळ देखाव्यापुरताच उरला आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पाणी हे जीवन आहे... असा सूर आळवत शहरभर पावसाळ्यातील छत्र्यांप्रमाणे पाणपोई उभारण्यात आल्या आहेत. मात्र, त्यात दररोज पाणी भरण्याकडे, साफसफाईकडे दुर्लक्ष होत असल्याचेही निष्पन्न झाले आहे. काही ठिकाणी रांजणे कोरडीठाक आढळली तर काही भागांतील पाणपोर्ईना झाकण नसल्याचे पहावयास मिळाले. धावत्या युगात तहानलेल्या वाटसरुंना पाणी पाजण्याची माणुसकी दाखवली जाते हे तसे स्वागतार्हच;पण काही पाणपोई केवळ शोभेचे बाहुले बनल्या आहेत. ‘लोकमत’ने शहरातील १५ पाणपोयांना भेटी दिल्या, त्यापैकी पाच पाणपाईंमध्ये थेंबभर पाणीही नव्हते. उर्वरित दहा ठिकाणी मात्र, पाणपोईंवर नागरिकांची उडी पडल्याचे चित्र दिसून आले.
सव्वाशे जारचा माणुसकीधर्म
बीड बसस्थानकात चार मित्रांनी मिळून उभारलेली पाणपोई हजारो प्रवाशांची तहान भागवत आहे. या पाणपोईवर दररोज सव्वाशे जारद्वारे थंड पाणी उपलब्ध करुन दिले जाते. पाण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केल्यावर गोंधळ, गडबड उडू नये, यासाठी एका वृद्धेला नेमले आहे. तेथे पाणी पिण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली होती. तेथे लावलेल्या बॅनरवर ना कोणाचे नाव आहे ना मोबाईल क्रमांक़ आजीबार्इंना कोणाची पाणपाई आहे ? असे विचारले तेंव्हा नावाचं काय करायचयं? असे म्हणत त्यांनी एक मोबाईल क्रमांक दिला. त्यावर संपर्क केला असता ‘कृपया आमचे नाव छापू नका, चार मित्रांनी मिळून हा उपक्रम आम्ही सुरु केलायं, प्रसिद्धी नको’ असे म्हणत त्यांनी नाव सांगण्याचेही टाळले.
सुभाषरोडवरील पाणपोईलाही घरघर
सुभाषरोडवरील दत्त मंदिर परिसरात शिवसेना पदाधिकाऱ्यांची छायाचित्रे असलेल्या पाणपोईलाही कोरड पडलेली दिसून आली. वर्दळीच्या या रस्त्यावर पाण्यासाठी वाटसरु रांजणात डोकावून पाहायचे;पण पाण्याअभावी त्यांचा हिरमोड होत होता.
जलकुंभ शोभेचे बाहुले
बसस्थानकात सामाजिक संघटनेच्या वतीने उभारलेला जलकुंभ केवळ शोभेचे बाहुले बनला आहे. या जलकुंभात थेंबभर पाणीही टाकले जात नाही. जलकुंभाचा वापर जाहिरातींचे पॉम्पलेट चिकटविण्यासाठीच केला जात आहे.
काय सांगतो नियम?
पाणपोई उभारताना संबंधितांनी जिल्हा प्रशासनाला कळविणे अपेक्षित आहे. पाणपोईत अशुद्ध पाणी राहू नये, यासाठी एक सेवक नेमला पाहिजे. पाणपोईसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस ठाण्याला माहिती देणे अनिवार्य आहे, असे नगरपालिकेतील पाणीपुरवठा अभियंता एम. एस. वाघ यांनी सांगितले. पाणपोर्इंमध्ये पाणी टाकण्याची जबाबदारी संबंधितांची आहे, पालिकेची नाही असा खुलासाही त्यांनी केला.
पाणपोर्इंचे ‘फोटोसेशन’
पाणपोई सुरु करणाऱ्यांनी दररोज रांजणात पाणी उपलब्ध करणे, स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र, उठसूठ पाणपोई सुरु करायची अन् फोटो काढून प्रसिद्धी करायची ... असा एककलमी कार्यक्रम सुरु आहे. पाणपोई कोरडीठाक असेल तर गाजावाजा काय कामाचा? अस सवाल उपस्थित केला जात आहे.
पाणपोईचा बदलता ‘ट्रेंड’
नागरिकांना स्वच्छ व थंडगार पाणी देण्याच्या उद्देशाने शहरातील व्यापारी वर्ग सरसावला आहे. पुर्वी जागोजागी माठ, रांजण उभारून त्यामध्ये पाणी साठवले जात होते. आता जमाना जारचा आहे. खर्चिक का असेना मात्र ताहानलेल्या वाटसरुला थंड पाणी मिळू लागले आहे.
जिल्हा रुग्णालयात विकतचे पाणी
शहरात सर्वच भागांत पाणपोई आहेत. मात्र, जिल्हारुग्णालय परिसरात एकही पाणपोई नसल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना विकतच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. रुग्णालय परिसराकडे संघटना, राजकीय पक्ष यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले.
येथे दुरवस्था तर येथे ‘अपडेट’
शहरातील पंधरा पाणपोर्इंची स्टींग दरम्यान पाहणी केली असता बसस्थानक परिसरातील जनाधार प्रतिष्ठान, बसस्थानकातील जलकुंभ, मोंढा रोडवरील युवाशक्ती मित्रमंडळ व कृषी व्यापार संघाचे तर सुभाषरोडवरील दत्तमंदिर येथील शिवसेनेच्यावतीने उभारण्यात आलेल्या पाणपोईची मोठी दुरवस्था असल्याचे दिसून आले. दुसरेकडे व्यापाऱ्यांनी व वैयक्तिकरित्या उभारण्यात आलेल्या ‘अपडेट’ पाणपोई पहावयास मिळाल्या. बसस्थानक परिसरातील देवगावकर जल या जारमधून स्वच्छ व थंडपाणपोई सुरू करण्यात आली आहे. तसेच संतश्रेष्ठ माऊली प्रतिष्ठान अंबिका चौक, नगरपालिके शेजारील अल-इमदाद पाणपोई, तर राजुरी वेस येथील जैन किराणाच्यावतीने पाणीपोई उत्तमरित्या उभारण्यात आली आहे.