कोरडे पडलेले पाणवठे वन्यजीवांसाठी जलमय
By Admin | Updated: March 14, 2016 00:31 IST2016-03-14T00:28:27+5:302016-03-14T00:31:22+5:30
गजानन वाखरकर, औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग नागनाथ तीर्थक्षेत्रामुळे प्रसिद्ध असलेल्या औंढा येथील पश्चिम वनपरिक्षेत्राअंतर्गत बांधण्यात आलेल्या १८ पाणवठ्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या तलावाचे पाणी आटून गेले

कोरडे पडलेले पाणवठे वन्यजीवांसाठी जलमय
गजानन वाखरकर, औंढा नागनाथ
ज्योतिर्लिंग नागनाथ तीर्थक्षेत्रामुळे प्रसिद्ध असलेल्या औंढा येथील पश्चिम वनपरिक्षेत्राअंतर्गत बांधण्यात आलेल्या १८ पाणवठ्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या तलावाचे पाणी आटून गेले असल्याने वन्यप्राण्यांची भटकंती होत असल्यामुळे या विभागाच्या वतीने विकत घेवून पाणी पाणवठ्यात सोडण्यात येत आहे. हे काम सध्या सुरू असल्याने या उपक्रमाचे वन्यप्रेमींकडून स्वागत केले जात आहे.
औंढा नागनाथ पश्चिम वन विभागाच्या वतीने वनपर्यटन परिसरामध्ये १२ पाणवठे पाण्याअभावी कोरडे पडले होते. त्यालगत असलेल्या तलावातील पाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सील करण्यात आल्याने या पाणवठ्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असलेल्या बगीचासाठी सुद्धा विकत घेवून पाणी देण्याचे काम वनपरिमंडळ अधिकारी एस. आर. दोडके, वनरक्षक ए. व्ही. भोसले, विलास चव्हाण, गोपाळ टोम्पे हे करीत आहेत. या ठिकाणी गार्डनमध्ये असलेल्या विविध प्रकारच्या झाडांना सुद्धा पाणी देवून वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर ब्राम्हणवाडा येथे २, अंजनवाडा येथे ३ व दुधाळा येथे २ असे पाणवठे जंगलातील प्राण्यांना पाणी पिण्यासाठी बांधण्यात आले होते.
नैसर्र्गिक जलस्त्रोत व तलाव, खाजगी विहिरींमधून पाणी घेवून या पाणवठ्यामध्ये सोडल्या जात होते. गत दोन महिन्यांपासून हे सर्व जलस्त्रोत आटल्याने जंगलातील वन्यप्राणी पाण्यासाठी गावालगत असलेल्या शेतामध्ये भटकत होते. ही बाब वनविभागाच्या लक्षात आल्याने अधिकाऱ्यांनी तत्काळ याची दखल घेत बांधण्यात आलेल्या पाणवठ्यामध्ये टँकरने विकत पाणी घेवून सोडण्यास सुरूवात केली आहे. आठ दिवसांतून एकवेळा हे पाणी पाणवठ्यात सोडल्या जात असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी डी.एस. खुपसे यांनी दिली आहे.
पूर्व विभागात भटकंती : प्राण्यांचे हाल
औंढा नागनाथ तालुक्यातील पुर्व परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या जंगलामध्ये मोजक्याच ठिकाणी पाणवठे बांधण्यात आले आहेत. या ठिकाणी झालेले काम थातूरमातूर केल्याने हे पाणवठे जमीनदोस्त झाले आहेत. या परिसरात वन्यप्राण्यांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत.
यंदाच्या दुष्काळाची दाहकता जंगलातील प्राण्यांनाही जाणवत आहे. जलालदाभा, सिरळी, सेंदूरसेना, सुकळी, मरसूळवाडी व शिरडशहापूर परिसरातील वन्यप्राणी पाण्यासाठी भटकंती करत नागरीवस्तींकडे धाव घेत आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांची शिकार होण्याची शक्यता वाढली आहे.
औंढा नागनाथ पश्चिम वन विभागाच्या वतीने वन पर्यटन परिसरामध्ये तयार करण्यात आलेले १२ पाणवठे यंदा कोरडे पडले आहेत. परिणामी वन्यप्राण्यांना पिण्याचे पाणी शोधताना भटकंती करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी पाण्याची सोय केली आहे.