शहरात नवव्या दिवशीही ‘पाणीबाणी’

By Admin | Updated: December 27, 2014 00:48 IST2014-12-27T00:34:35+5:302014-12-27T00:48:38+5:30

औरंगाबाद : शहरातील पाण्याची ओरड अजून सुरूच आहे. नऊ दिवसांपासून नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. कंपनी टँकरने पाणी देत नाही. नळांना वेळेवर पाणी येत नाही.

'Waterfall' on the ninth day in city | शहरात नवव्या दिवशीही ‘पाणीबाणी’

शहरात नवव्या दिवशीही ‘पाणीबाणी’

औरंगाबाद : शहरातील पाण्याची ओरड अजून सुरूच आहे. नऊ दिवसांपासून नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. कंपनी टँकरने पाणी देत नाही. नळांना वेळेवर पाणी येत नाही. त्यामुळे खाजगी टँकर्सकडून नागरिकांना पाण्याची गरज भागवावी लागली. पालिका दरबारी मात्र बैठकांचे राजकारण सुरू असून पाणीपुरवठ्यासाठी तोडगा काढण्याबाबत सूचना आणि आदेश देण्यापलीकडे काहीही करण्यात आलेले नाही. शिवसेना- भाजपा युतीच्या राजकीय आखाड्यात पाणीपुरवठा करणाऱ्या खाजगी कंपनीवर अंकुश कोण ठेवणार, हे शुक्रवारी स्पष्ट झाले नाही.
भाजपाने आ. अतुल सावे यांना घेऊन पाहणी केली. त्यानंतर आज सकाळी भाजपाच्या नगरसेवकांनी सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना मारहाण केली. त्याच पावलावर पाऊल शिवसेना नगरसेवकांनी ठेवले. त्यांनी १०.०० वाजेच्या सुमारास अधिकाऱ्यांना चोपले. पाणीपुरवठ्यासाठी युती आक्रमक असल्याचे दाखवून देण्याच्या राजकीय नादात उपाययोजना पुढे आल्या. मात्र, त्यावर अंमलबजावणी केव्हा होणार हे स्पष्ट नाही.
दुपारी ४.०० वाजेच्या सुमारास विश्रांतीनगरमधील महिलांनी टँकरच्या मागणीसाठी प्रभाग ‘ई’ कार्यालय आणि एन-५ जलकुंभावर आंदोलन केले. पैसे भरूनही टँकरने पाणीपुरवठा होत नाही, तर दुसरीकडे नवीन टँकरची नोंदणी केली जात नाही. टँकरने पाणीपुरवठा केला जावा या मागणीसाठी महिलांनी प्रभाग कार्यालयात जोरदार घोषणा देऊन आंदोलन केले. तेथे कुणीही अधिकारी प्रतिसाद देत नसल्याचे पाहून एन-५ जलकुंभावर आंदोलन केले. भारतनगर वॉर्डातील नवनाथनगर, समर्थनगर येथील नागरिकांनी आज उपमहापौर जोशी यांना निवेदन देऊन टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी केली.
ड्राय फ्रायडे
गेल्या शुक्रवारपासून या शुक्रवारपर्यंत पाण्याची बोंब आहे. शहरातील सर्वच भागांमध्ये आज नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. सोमवारी रात्री फारोळा येथील डिलिव्हरी लाईनला भगदाड पडल्यामुळे सिडको-हडकोसह सर्व शहरात पाण्याची बोंब झाली. गुरुवारी रात्री वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शुक्रवारी नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागले. त्यामुळे तब्बल नऊ दिवस निर्जळीला सामोरे जावे लागल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. महागड्या टँकर्सचे पाणी त्यांना विकत घ्यावे लागले. नऊ दिवसांपासून २२ वॉर्डांमध्ये पाणीपुरवठा झालेला नाही. शुक्रवारीही त्या वॉर्डांपैकी बहुतांश ठिकाणी निर्जळी होती. नागरिकांना ३०० रुपयांप्रमाणे टँकर विकत घ्यावे लागले. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने मोफत टँकरने पाणीपुरवठा न केल्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

Web Title: 'Waterfall' on the ninth day in city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.