जलकुंभ देखरेखीखाली !
By Admin | Updated: March 5, 2015 00:03 IST2015-03-04T23:47:18+5:302015-03-05T00:03:24+5:30
लातूर : लातूर शहरात पाणीपुरवठ्यासाठी पाच जलकुंभ आहेत़ तर निलंगा व उदगीर शहरातही पाणीपुरवठ्यासाठी जलकुंभ तयार केले आहेत़

जलकुंभ देखरेखीखाली !
लातूर : लातूर शहरात पाणीपुरवठ्यासाठी पाच जलकुंभ आहेत़ तर निलंगा व उदगीर शहरातही पाणीपुरवठ्यासाठी जलकुंभ तयार केले आहेत़ मात्र या जलकुंभाची सुरक्षा व काळजी घेतली जात नसल्याची ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशननंतर निदर्शनास आले़ याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, लातूर शहरातील पाणीपुरवठ्याचे पाचही जलकुंभ २४ तास देखरेखीखाली असतील याचे नियोजन केले जाणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठ्याची योजना कालच महानगर पालिकेकडे आली आहे. मनपा व एमजीपीच्या कर्मचाऱ्यांत चर्चा करून जलकुंभावर २४ तास देखरेख ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार बुधवारी शहरातील पाचही जलकुंभावर कर्मचाऱ्यांचा पहारा होता.
लातूर शहरातील गांधी चौकातील आणि यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुलाच्या पाठीमागे असलेल्या जलकुंभावर कसलीही सुरक्षा नसल्याचे तसेच अस्वच्छता असल्याचे ‘लोकमत’ चमूने मंगळवारी केलेल्या स्टींग आॅपरेशननंतर उघडकीस आले आहे. याची दखल घेत बुधवारी मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी शहरातील पाचही जलकुंभाची माहिती घेतली. पाणी वितरणासाठी किती कर्मचारी आहेत. जलकुंभावर रक्षक म्हणून किती कर्मचारी आहेत. त्यांच्या कामाच्या वेळा काय आहेत. त्यांच्या कामाचे नियोजन कोण करते. जलकुंभावर २४ तास मनुष्यबळ ठेवण्यास काय अडचणी आहेत. आदी बाबींचा आढावा घेतला. १ मार्चपर्यंत पाणीपुरवठ्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे होती. जलकुंभावरही त्यांचेच कर्मचारी आहेत. बिलभरणा केंद्रही त्यांचेच आहेत. कालच जीवन प्राधिकरणाकडून ही योजना मनपाकडे आली आहे. त्यामुळे दोघांचा विचार घेऊन जलकुंभावर २४ तास पहारा ठेवण्याचा निर्णय मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी घेतला आहे. गांधी चौकातील जलकुंभवर कर्मचारी असतात. नांदेड नाका येथील जलकुंभावरही कर्मचारी आहेत. बार्शी रस्त्यावरील जलकुंभावर जीवन प्राधिकरणाचे कार्यालयच आहे. त्यामुळे येथे कर्मचारी असतात. फक्त यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुलाच्या आणि औसा रोड असलेल्या जलकुंभावर पहारा नाही. या दोन्ही ठिकाणी कर्मचारी ठेवण्याचे नियोजन केले जात असल्याची माहिती मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी दिली. ‘लोकमत’मुळे चांगला निर्णय घेतला असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, बुधवारी शहरातील पाचही जलकुंभावर महानगरपालिकेचे कर्मचारी दिसून आले. आमच्या छायाचित्रकाराने गांधी चौक आणि नांदेड नाका तसेच यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुलाच्या पाण्याच्या टाकीवर कालच्याप्रमाणे चढण्याचा प्रयत्न केला. पण आज त्यांना हटकण्यात आले. फोटो काढू नका, आमची नोकरी आहे, साहेब. काल तुम्हीच फोटो काढून पेपरात दिले. त्यामुळे आज दिवसभर आम्हाला येथे बसावे लागले आहे, असे म्हणून फोटो काढण्यास त्या कर्मचाऱ्याने विरोध केला.