जलवाहिनीची गळती थांबता थांबेना !

By Admin | Updated: April 15, 2016 00:47 IST2016-04-15T00:18:07+5:302016-04-15T00:47:26+5:30

वाशी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीस किमी अंतराच्या जलवाहिनीला मागील अनेक महिन्यांपासून लागलेली गळती रोखण्यास नगर पंचायतीला अपयश आले

Water tank leak stops! | जलवाहिनीची गळती थांबता थांबेना !

जलवाहिनीची गळती थांबता थांबेना !

अपव्यय सुरूच : वाशी शहराला पाच दिवसांआड पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांची भटकंती
वाशी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीस किमी अंतराच्या जलवाहिनीला मागील अनेक महिन्यांपासून लागलेली गळती रोखण्यास नगर पंचायतीला अपयश आले असून, यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे.
भूम तालुक्यातील वंजारवाडी प्रकल्पातून वाशी शहरास पाणीपुरवठा होत आहे. एकीकडे शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून, अनेकाकडे पाणी साठवण्यासाठी टाक्या नसल्यामुळे चौथ्या दिवशीच पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे जवळपास वीस किलोमिटर लांबीच्या या जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली लागल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. जलशुध्दीकरण केंद्रपासून भूम ते पारडी रोडवर अनेक ठिकाणी ही गळती चालू आहे. वाशी फाट्यानजीक व सदाशिवराव पवार यांच्या बागेजवळ तर मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने यापूर्वीही वृत्त प्रसिध्द केले होते. त्यानंतर प्रशासनाकडून गळती थांबवण्याचा प्रयत्नही झाला. त्यावेळी दीड ते दोन लाख लिटर पाण्याचा अपव्यय थांबविल्याचा दावा पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी केला. मात्र, अद्यापही अनेक ठिकाणी गळती चालूच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे याकडे प्रशासनाने गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
पाठपुरावा सुरू - नितीन चेडे
यासंदर्भात उपनगराध्यक्ष नितीन चेडे यांना विचारले असता सदरील गळती तातडीने बंद करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. तसेच सदरील जलशुध्दीकरण यंत्र दुरूस्तीसाठी पाठपुरावा चालू असून, येत्या काही दिवसात सदरील जलशुध्दीकरण यंत्र कार्यान्वित करण्यात येणार आहे. गेल्या दीड महिन्यापासून ब्लिचिंंग पावडर वापरण्यात येत नसल्याचे सांगत यांसदर्भात नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना सांगून त्वरित ब्लिचिंंग पावडर टाकण्याची व्यवस्थाही करण्यात येईल, असेही चेडे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.
तोट्यांअभावी अपव्यय
शहरात अनेक नागरिकांनी नळांना तोट्या बसविलेल्या नाहीत. यामुळेही मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे दिसून येत आहे. नगरपंचायतीने याकडे लक्ष देऊन नळास तोट्या बसवून अपव्यय थांबवावा अशी मागणीही नागरिकातून होत आहे.
जलशुध्दीकरणाच्या यंत्रसामग्रीवर चढला गंज
वंजारवाडी प्रकल्पातील पाण्याची पातळी कमी होत असून, येत्या १० ते १५ दिवसानंतर चारीद्वारे विंधन विहिरीत पाणी आणावे लागणार आहे. त्यांनतर प्रकल्पातील पाणी मोटारीव्दारे उपसून विंधनविहिरीत सोडावे लागणार आहे. जलशुध्दीकरण केंद्रावरील जलशुध्दीकरण यंत्र गेल्या अनेक वर्षापासून बंद असून त्यावर गंज चढलेला आहे. त्यामुळे मागील दीड ते दोन महिन्यापासून प्रकल्पातून आलेले पाणी थेट नळाद्वारे सोडण्यात येत आहे.

Web Title: Water tank leak stops!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.