पाण्याच्या टाकीचा जिना कोसळला
By Admin | Updated: July 2, 2017 00:43 IST2017-07-02T00:39:49+5:302017-07-02T00:43:52+5:30
औरंगाबाद : सिडको एन-७ येथे १९७५ मध्ये बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचा जीर्ण भाग शनिवारी सकाळी ६ वा. अचानक कोसळला

पाण्याच्या टाकीचा जिना कोसळला
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सिडको एन-७ येथे १९७५ मध्ये बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचा जीर्ण भाग शनिवारी सकाळी ६ वा. अचानक कोसळला. पाण्याच्या टाकीवर जाणाऱ्या पायऱ्यांचा मलबा कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानावर लोखंडी पत्रे चिरून घरात कोसळला. विशेष बाब म्हणजे ज्या खोलीवर हा मलबा पडला तेथे मनपा कर्मचाऱ्यांची दोन लहान मुले झोपली होती. सुदैवाने दोन्ही चिमुकले बालंबाल बचावली. घटनास्थळी तातडीने मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी भेट दिली.
सिडको एन-७ आंबेडकरनगर येथे नगर परिषदेच्या काळात १९७५ मध्ये पाण्याची टाकी बांधण्यात आली. या टाकीवरून तब्बल १३ वॉर्डांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे टँकरद्वारे पाणी भरण्यात येते. मागील दोन वर्षांपासून सिडको-हडकोतील नगरसेवक प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करीत आहे की, पाण्याची टाकी जीर्ण झाली असून, ती कोणत्याही क्षणी कोसळू शकते. मात्र, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. शनिवारी सकाळी ६ वा. अचानक टाकीच्या पायऱ्यांचा काही भाग
निखळला.
सिमेंटचा मलबा थेट मनपा कर्मचारी संजय जेजूरकर, मोहन चांदोरे यांच्या निवासस्थानावर कोसळला. यावेळी जेजूरकर यांच्या घरातील लहान मुले रितिका, सार्थक जेजूरकर साखरझोपेत होती. मलबा एवढा जोरात कोसळला की, घरावरील लोखंडी पत्रे कापली गेली. घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकीची मोडतोड झाली. सुदैवाने कोणालाही इजा पोहोचली नाही.
घटनेची माहिती सकाळी १०.३० वा. कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर लगेचच मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकरही दाखल झाले. त्यांनी निवासस्थानात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना तातडीने दुसऱ्या निवासस्थानांमध्ये स्थलांतरित केले.
पाण्याची टाकी जमीनदोस्त करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी, त्यापूर्वी नवीन टाकी उभारण्याच्या दृष्टीने तातडीने अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश दिले.
आपण टाकी धोकादायक असल्याचे पत्र वारंवार दिल्याचे नगरसेवक नितीन चित्ते, राहुल रोजतकर यांनी सांगितले.