वीज नसल्याने बावीस खेड्यांचा पाणीपुरवठा बंद

By Admin | Updated: June 28, 2014 01:15 IST2014-06-28T00:15:33+5:302014-06-28T01:15:04+5:30

अविनाश मुडेगावकर, अंबाजोगाई प्रशासनाची दिरंगाई व टोलवाटोलवीच्या कारभारामुळे अंबाजोगाई व परळी तालुक्यातील पूस येथील २२ खेडी नळयोजना विद्युत बिघाडामुळे आठवडाभरापासून बंद आहे.

Water supply to twenty-two villages is closed due to lack of electricity | वीज नसल्याने बावीस खेड्यांचा पाणीपुरवठा बंद

वीज नसल्याने बावीस खेड्यांचा पाणीपुरवठा बंद

अविनाश मुडेगावकर, अंबाजोगाई
प्रशासनाची दिरंगाई व टोलवाटोलवीच्या कारभारामुळे अंबाजोगाई व परळी तालुक्यातील पूस येथील २२ खेडी नळयोजना विद्युत बिघाडामुळे आठवडाभरापासून बंद आहे. अंबलवाडी तलावात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असूनही या परिसरातील २२ गावांमध्ये पाण्यासाठी ठणठणाट सुरू आहे. प्रशासनाच्या दिरंगाई धोरणाचा फटका सहन करीत ग्रामस्थांची मोठा जलस्त्रोत उपलब्ध असूनही पाण्यासाठी वणवण भटकंती सुरूच आहे.
अंबाजोगाई, परळी तालुक्यातील २२ खेडयांना अंबलवाडीच्या साठवण तलावातून पाणीपुरवठा करण्यासाठी पूस येथून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या पाणीपुरवठा योजनेचा लाभ अंबलवाडी, वरवटी, पूस, गिरवली बावणे, गिरवली आपेट, तळणी, लाडझरी, अंबलटेक, तेलघना, लेंडेवाडी, दौंडवाडी, मैंदवाडी, नागदरा व परिसरातील अनेक गावांना होतो. या योजनेच्या माध्यमातून परिसरातील सर्व गावात पाणीपुरवठा योजना सुरू आहे. ही पाणीपुरवठा योजना सात वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित झाली.
मात्र गेल्या सात वर्षात सततच्या बिघाडामुळे व विविध कारणांमुळे सात वर्षात केवळ दोन ते तीन वर्षच या योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा झाला. राज्यात सर्वत्र भीषण पाणी टंचाईवर उपाययोजना सुरू असतांना या परिसरातील ग्रामस्थांना मोठा जलस्त्रोत उपलब्ध असूनही केवळ शासनाच्या दिरंगाईचा फटका सहन करावा लागत आहे. गेल्या आठ दिवसांपासून अंबलवाडी ते पूस या भागाचा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे विद्युत पुरवठ्याअभावी पाणीपुरवठा ठप्प आहे.
पाठशिवणीचा खेळ सुरूच
सलग वर्षभर पाणीपुरवठा होईल, अशी हमी या पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून मिळेल अशी खात्री या परिसरातील २२ गावातील ग्रामस्थांना कधीच अनुभवता आली नाही. सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणांनी ही योजना ठप्प असते. परिणामी पाण्यासाठी वणवण भटकंतीची वेळ ग्रामस्थांच्या नशिबी कायम आहे. हा पाठशिवणीचा खेळ कधी संपणार असा संतप्त सवाल पूस येथील सामाजिक कार्यकर्ते महेश गौरशेटे, वरवटी येथील रखमाजी चाटे, यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली.
या संदर्भात या विभागाचे कनिष्ठ अभियंता गोविंद भुजबळ यांच्याकडे विचारणा केली असता महावितरणच्या वाहिनीती बिघाडामुळे ही योजना बंद राहिली. गेल्या दोन दिवसांपासून विद्युत वाहिन्यांचा बिघाड दूर झाला असून ही योजना तात्काळ सुरू होणार असल्याचे भुजबळ ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.

Web Title: Water supply to twenty-two villages is closed due to lack of electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.