‘रमजान ईद’च्या दिनी मनपाचा पाणीपुरवठा ठप्प

By Admin | Updated: July 6, 2016 23:54 IST2016-07-06T23:42:56+5:302016-07-06T23:54:57+5:30

लातूर : लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई असून, वीजपुरवठा बंद झाल्याने बेलकुंड व माळकोंडजी येथून होणारे पाणी संकलन ठप्प झाले आहे.

Water supply at the time of 'Ramzan Eid' was stopped | ‘रमजान ईद’च्या दिनी मनपाचा पाणीपुरवठा ठप्प

‘रमजान ईद’च्या दिनी मनपाचा पाणीपुरवठा ठप्प


लातूर : लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई असून, वीजपुरवठा बंद झाल्याने बेलकुंड व माळकोंडजी येथून होणारे पाणी संकलन ठप्प झाले आहे. तसेच डोंगरगाव बॅरेजेसच्या रस्त्यावर चिखल झाल्यामुळे येथील पाणी संकलनही बंद करण्यात आले आहे. परिणामी, ‘रमजान ईद’च्या ऐन सणात लातूर शहराचा पाणीपुरवठा बंद आहे. शहरातील सर्वच जलकुंभ कोरडेठाक पडले असून, आऊट पोस्ट लाईनवरील पाणीही बंद झाले आहे. मनपाचे प्रशासन आणि पदाधिकारी मात्र बेफिकीर आहेत.
लातूर शहराला दररोज रेल्वेने २५ लाख लिटर आणि निम्न तेरणा प्रकल्पातून २० ते २५ तसेच डोंगरगाव बॅरेजेसमधून १५ ते २० लाख लिटर असे एकूण दररोज ६५ ते ७० लाख लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु, काल मंगळवारी वादळी वाऱ्यात झालेल्या पावसामुळे निम्न तेरणावरील मोटारीचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे पाणी उपसा बंद आहे. डोंगरगाव उच्चस्तरीय बंधाऱ्याच्या रस्त्यावरही पावसामुळे चिखल झाला आहे. त्यामुळे तेथून होणारे १५ ते २० लाख लिटर पाण्याचे संकलन बंद आहे. केवळ मिरजहून येणारे २५ लाख लिटर एवढेच पाणी मनपाकडे आहे. बुधवारी सकाळी मिरजचे पाणी सरस्वती कॉलनी, विवेकानंद चौकातील जलकुंभात साठविले होते. परंतु, दुपारी १ वाजेपर्यंतच ते संपले. परिणामी, शहरातील सरस्वती कॉलनी, नांदेड नाका, गांधी चौक व अन्य सर्वच जलकुंभ कोरडेठाक पडले आहेत. स्टँड पोस्टवरील लाईनवर काही नागरिक पाणी भरत होते. मात्र ती लाईनही कोरडी असल्याने शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी, बुधवारी शहरातील कोणत्याच भागामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा झाला नाही. ऐन ‘रमजान ईद’च्या सणादिवशी पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. मनपा प्रशासनाने सणानिमित्त पाणी राखीव ठेवायला हवे होते.
ज्या प्रभागात मुस्लिम समाजाचा मोहल्ला आहे अशा प्रभागात तरी पाणी वितरणाची सोय करायला हवी होती. परंतु, त्याचे काहीच नियोजन केले नसल्यामुळे ऐन सणात टंचाईचा सामना शहरवासीयांना करावा लागत आहे. (प्रतिनिधी)
रमजान ईदचा सण लातूर शहरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हिंदू-मुस्लिम बांधव भाईचाराने हा सण साजरा करतात. किमान या सणाच्या दिवशी पाणीपुरवठा होणे आवश्यक होते. परंतु, मनपाच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांचा ताळमेळच नाही. पाणी वितरणात पदाधिकारी एक सांगतात, तर अधिकारी दुसरेच सांगत आहेत. नियोजनाचा अभाव असल्याने लातूरकरांना सणात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
मिरजहून दररोज जलपरीची २५ लाख लिटर पाण्याची एक खेप होत आहे. हा एकमेव पर्याय सोडला तर स्थानिक स्त्रोतांतील संकलन वारंवार विस्कळीत होत आहे. गेल्या दोन आठवड्यात दोनदा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला.
दहा दिवसांपूर्वीच निम्न तेरणातील वीज मोटार जळाली होती. शिवाय, रेल्वेचे पाणी पाच दिवस बंद होते. त्यावेळीही शहराचा पाणीपुरवठा मनपा प्रशासनाने बंद केला होता. नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करून मनपा प्रशासन मोकळे झाले होते. आता ऐन सणातही सहकार्याची भाषा करून प्रशासन मोकळे झाले आहे.

Web Title: Water supply at the time of 'Ramzan Eid' was stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.