पाणीपुरवठा योजनेला लागले गळतीचे ग्रहण !

By Admin | Updated: July 24, 2014 00:13 IST2014-07-24T00:02:00+5:302014-07-24T00:13:34+5:30

उमरगा : शहराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी माकणी धरणातून तब्बल २३ कोटी रुपये खर्च करुन योजना राबविण्यात आली आहे.

Water supply scheme leakage! | पाणीपुरवठा योजनेला लागले गळतीचे ग्रहण !

पाणीपुरवठा योजनेला लागले गळतीचे ग्रहण !

उमरगा : शहराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी माकणी धरणातून तब्बल २३ कोटी रुपये खर्च करुन योजना राबविण्यात आली आहे. मात्र या योजना कार्यान्वित होवून काही महिन्यांचा कालावधी लोटलेला असतानाच ठिकठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा मागील दहा दिवसांपासून बंद पडला असून, नागरिकांना तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे.
शहराची लोकसंख्या ५० हजाराच्या आसपास आहे. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता, २३ कोटी रुपये खर्च करुन माकणी धरणातून पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली. भीषण टंचाईच्या काळात ही योजना युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून सुरुवातीला प्रतिदिन ३० लाख लिटर पाणी धरणातून उचलले जात होते. हे पाणी शहरातील ५ हजारावर नळकनेक्शन धारकांना पुरवठा करण्यात येत होते. मात्र मागील काही दिवसांपासून या योजनेला जागोजागी गळती लागली आहे. एका ठिकाणची गळती दुरुस्त करेपर्यंत दुसऱ्या ठिकाणी सुरु होत आहे. माकणी ते समुद्राळ या २७ कि.मी. अंतरासाठी २००४-०५ साली १२ इंची लोखंडी पाईपलाईन करण्यात आली आहे. सास्तूर, माकणी, समुद्राळ आणि कोंडजीगड या रस्त्याचे व दूरसंचारचे वायर टाकण्यासाठी खोदकाम सुरु असताना या पाईपलाईनला सतत गळती लागत आहे. गेल्या सात दिवसांपासून कोंडजीगड, समुद्राळ, नागराळ या भागातील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. समुद्राळ व नागराळ येथील काम पूर्ण झाले असून, कोंडजीगड येथील गळती काढण्याचे काम बुधवारी दिवसभर सुरु होते.
दरम्यान, यासंदर्भात नगराध्यक्षा केवळबाई औरादे यांच्याशी संपर्क साधला असता, दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली असून, गुरुवारपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिल्याचे त्या म्हणाल्या.
तीव्र पाणीटंचाई
जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे मागील आठ दिवसांपासून शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद झालेला आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्यामुळे उमरगेकरांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दुरुस्तीसाठी साहित्य नाही
जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पालिकेकडे आवश्यक साहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे पाईपलाईनची गळती काढण्यास विलंब होत आहे, असे पाणी पुरवठा विभागाचे शिरगुरे यांनी सांगितले.
आणखी पाच दिवस लागणार
पाईपलाईनची गळती काढण्याचे काम मागील सात दिवसांपासून सुरु आहे. ते अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या पाच दिवसांमध्ये हे काम पूर्ण करुन टप्प्या-टप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे पाणी पुरवठ्याचे शाखा अभियंता स्वामी यांनी सांगितले.
जलकुंभात ठणठणाट
समुद्राळ येथे १९९२-९३ साली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ६८ लाख लिटर क्षमतेचे जलकुंभ उभारण्यात आले आहे. मात्र जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे सदरील जलकुंभामध्ये ठणठणाट आहे.

Web Title: Water supply scheme leakage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.