पाणीपुरवठ्याची विहीर कोरडीठाक
By Admin | Updated: August 5, 2014 23:57 IST2014-08-05T23:54:21+5:302014-08-05T23:57:21+5:30
बिलोली : मागच्या २५ वर्षांत पहिल्यांदाच ऐन पावसाळ्याच्या हंगामात बिलोली पालिकेची मांजरा नदीस्थित भूमिगत विहीर कोरडीठाक झाली आहे़

पाणीपुरवठ्याची विहीर कोरडीठाक
बिलोली : मागच्या २५ वर्षांत पहिल्यांदाच ऐन पावसाळ्याच्या हंगामात बिलोली पालिकेची मांजरा नदीस्थित भूमिगत विहीर कोरडीठाक झाली आहे़ आडातच नाही तर पोहोऱ्यात कुठून येणाऱ़़ अशी परिस्थिती मांजरा नदीची झाली आहे़ परिणामी पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून पाणीटंचाईवर पर्याय शोधणे अवघड बनले आहे़
तेलंगणा सीमावर्ती मांजरा नदी पात्रातून बिलोली शहरासह जवळपासच्या २५ ते ३० खेड्यांना पाणीपुरवठा केला जातो़ शहरांसह खेड्यापाड्यातील पाणीपुरवठ्याच्या योजना मांजराच्या पात्रात आहेत़ पात्रातील जलसाठा सातत्याने असणाऱ्या भागात भूमिगत विहिरी खोदून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो़ प्रामुख्याने उन्हाळ्याच्या शेवटी-शेवटी अशा भूमिगत विहिरी कोरड्या पडतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे़ अशा परिस्थितीत टँकर अथवा विहिरी अधिग्रहण करून पाणीटंचाईवर तोडगा काढला जातो़ पण उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर पर्याय करण्यासाठी वेगवेगळे उपाय योजना केल्या जातात़
पावसाळ्यातील जलसाठा वाढल्यानंतर येणाऱ्या उन्हाळ्यातील पाणीटंचाई दूर होते असा २५ वर्षांतील अनुभव आहे़ पण यावर्षी आॅगस्ट उजाडला तरी मोठ्या पावसाचा पत्ता नाही़ अधूनमधून पाऊस पडतो, पण रिमझिम किंवा जमिनी भिजण्यापुरताच़ पण मागच्या दोन महिन्यात पावसाळ्याची सरासरी शंभर मि़मी़देखील गाठलेली नाही़ रस्त्यावर, नदी, नाले आदीमधून वाहून जाणारा पाऊस अद्याप झाला नाही़ त्यामुळे मांजरा नदीमध्येदेखील वाहते पाणी अजूनही दिसत नाही़
मांजरात जलसाठा झाला नसल्याने भूमिगत विहिरीतील पाणीपातळी देखील वाढली नाही़ परिणामी आॅगस्टमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ ऐन पावसाळ्यात अशी परिस्थिती प्रथम निर्माण झाल्याचे जाणकार सांगत आहेत़ पावसाळ्याने पाठ फिरवल्याने भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे़ (वार्ताहर)
वाळू उपशामुळे पर्यावरणावर परिणाम
याचवर्षी पावसाळ्यात पहिल्यांदाच खाजगी वाळूपट्टयातून वाळूउपसा केला जात आहे़ सततच्या वाळूउपशामुळे पर्यावरणावर परिणाम होवून पाणीपातळी घटली आहे़ मागच्या ५० वर्षांत पावसाळ्यात कधीच वाळूउपसा झाला नाही़ पण यावर्षी पावसाळ्याने आॅगस्टमध्येही पाठ फिरवल्याने वाळू ठेकेदारांना चांगलीच संधी मिळाली़ शासकीय घाट बंद असले तरी खाजगी वाळूघाटातून सततच्या वाळूउपशामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे़ बेसुमार उपशामुळे मांजराचे वाळवंट बनले असून जलसाठा रोडावला आहे़ पाणी नसल्याचा परिणाम वाळूउपसा हे देखील कारण होय़