पाणीपुरवठा विस्कळीतच
By Admin | Updated: July 31, 2016 01:10 IST2016-07-31T01:00:20+5:302016-07-31T01:10:02+5:30
जालना : अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्रातील ब्लिचिंग पावडर नसल्याने चार दिवसांपासून जालना शहराचा पाणीपुरवठा बंद होता.

पाणीपुरवठा विस्कळीतच
जालना : अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्रातील ब्लिचिंग पावडर नसल्याने चार दिवसांपासून जालना शहराचा पाणीपुरवठा बंद होता. दरम्यान, शनिवारी सकाळी मुंबईहून परतलेल्या मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित एजन्सीला आदेश देताच ब्लिचिंग पावडर उपलब्ध झाले आणि पाणीपुरवठा सुरळीत झाला.
मागील काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत आहे. यामुळे पाणीपुरवठा दररोज होईल, असे चित्र निर्माण झाले असले तरी पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे आठ दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा बंद होता. परिणामी नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागली. नवीन जालना भागासाठी घाणेवाडी जलाशयातून पाणीपुरवठा करण्यात येतो. घाणेवाडी जलाशयात साठा नसल्याने जायकवाडीच्या जलवाहिनीवरुन दोन्ही भागांना पाणी पुरवठा केला जात आहे. शहरातील पाणी पुरवठ्यासाठी १३ जलकुंभ उभारले आहेत. शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी ब्लिचिंग पावडरची गरज असते. गत आठवड्यात पालिकेचे पाणी पुरवठा सभापती राहुल हिवराळे यांनी मुख्याधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तोपर्यंत ब्लिचिंग उपबल्ध होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर काही कामानिमित्त मुख्याधिकारी संतोष खांडेकर मुंबईला गेले. दरम्यान, अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्रातील ब्लिचिंग संपले. मात्र, संबंधित सखाराम इंटरप्रायजेस या कंत्राटदार एजन्सीने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केला. शनिवारी सकाळी मुख्याधिकारी खांडेकर हे जालन्यात परतले. त्यांना याबाबतची कल्पना देण्यात आली. त्यांनी तात्काळ संबंधित एजन्सीला फोन करुन ब्लिचिंग उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले. पालिकेचे अभियंता अशोक दासवाड म्हणाले, २०० बॅग जिप्सम आले आहे. पाण्यात जिप्सम मिसळून नवीन जालना भागात शुद्ध पाणीपुरवठा सुरू झाला आहे. जुना जालन्यातही पाणीपुरवठा सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. (प्रतिनिधी)