पाणीपुरवठा सुरू
By Admin | Updated: February 10, 2015 00:29 IST2015-02-09T23:54:23+5:302015-02-10T00:29:03+5:30
जालना : जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेतून अंबड शहराला पाणी देण्याचा शुभारंभ सोमवारी दुपारी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आला.

पाणीपुरवठा सुरू
जालना : जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेतून अंबड शहराला पाणी देण्याचा शुभारंभ सोमवारी दुपारी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आला.
फिल्टर बेट येथे झालेल्या या कार्यक्रमास आ. राजेश टोपे, आ. नारायण कुचे, माजी आमदार विलास खरात, नगराध्यक्षा मंगलताई कटारे, उपनगराध्यक्ष संदीप आंधळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान, त्यानंतर स्व. गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात झालेल्या मेळाव्यात बोलताना पालकमंत्री लोणीकर म्हणाले, अंबडचा पाणीप्रश्न खूप जुना आहे. गेल्या पाच-सहा वर्षापासून पाण्यावर चर्चा. अंबडला पाणी देण्यावरून संघर्ष निर्माण झाला होता. भाजपाने सत्ता आल्यानंतर हा विषय गांभिर्याने हाताळला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ या कामाला मंजुरी दिली, असे सांगताना ६० वर्षाच्या काँग्रेस सरकारवर टीका केली. साडेतीन हजार कोटींचे कर्ज करून ठेवले, अशी टीका त्यांनी केली.
यावेळी पालकमंत्री लोणीकर म्हणाले, सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळ निवारण्यासाठी आम्ही युध्दास्तरावर प्रयत्न करत आहोत. ५ लाख ते २५ लाख रुपयांपर्यंतचा दुष्काळ निवारण निधीच्या योजना मंजूर करण्याचे अधिकार आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. बंद पडलेल्या योजना पुन्हा सुरु करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत असुन जास्तीस जास्त योजना सुरु करण्याचा आमचा प्रयत्न राहील. राज्यातील २० जिल्हयातील २०० गावांमध्ये स्वच्छता मोहिम युध्दास्तरावर राबविली जात आहे. सर्वांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी आम्ही कटीबध्द असल्याचे प्रतिपादन यावेळी पालकमंत्री लोणीकर यांनी केले.
यावेळी आ. नारायण कुचे, विलास खरात, संजय तौर, दीपक ठाकूर, संजय हर्षे, भाऊसाहेब गोरे, श्रीरंग खरात, द्वारकाप्रसाद मंत्री, औदुंबर बागडे, सुनील आर्दड, कृष्णा जिगे, जगदीश नागरे, अनिल कोलते आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अंबडला पाणी आल्याचा क्षण माझ्या जीवनातील सर्वोच्च क्षण असल्याचे आ. टोपे यांनी फिल्टर बेट येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले. टोपे म्हणाले, बऱ्याच दिवसांपासून अंबडचा पाणीप्रश्न प्रलंबित होता. तसेच अंबडला पाणीपुरवठा करणारे जलस्त्रोत संपुष्टात आल्याने भीषण टंचाईला सामोरे जावे लागत होते. जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेतून अंबडला ४ एमएलडी पाणी मिळावे, अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. आपण कुठल्याही प्रकारचे श्रेय घेण्याचा विषय मनातही आणला नव्हता, असे ते म्हणाले.
माजी आ.विलासराव खरात म्हणाले की, अंबड शहराचा पाणीप्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. मात्र हा प्रश्न भाजपाचे सरकार सत्तेवर आल्याने तातडीने सोडविण्यात आला आहे. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी या प्रश्नी चर्चा करून हा प्रश्न सोडविला, असे अॅड. विलास खरात यांनी सांगितले.
शासकीय कार्यक्रमाची माहिती आ. टोपे यांना नव्हती. त्यामुळै आ. टोपे कार्यक्रमस्थळी येणार की, नाही अशी चर्चा सुरू झाली होती. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी आ. टोपे यांना दुरध्वनीद्वारे कार्यक्रमास येण्याचे आमंत्रण दिले. आपल्याशिवाय कार्यक्रम सुरू होणार नाही, असे म्हटल्यावर आ. टोपे काही वेळातच तेथे दाखल झाले. दरम्यान, या कार्यक्रमासाठी शासकीय प्रोटोकॉल पाळला गेला नाही, अशी खंत टोपे यांनी व्यक्त केली.