आठ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद
By Admin | Updated: August 24, 2014 23:53 IST2014-08-24T23:19:59+5:302014-08-24T23:53:22+5:30
पूर्णा : पावसाळ्यातील तीन महिने उलटूनही पुरेसा पाऊस न झाल्याने पूर्णा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पूर्णा नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे़

आठ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद
पूर्णा : पावसाळ्यातील तीन महिने उलटूनही पुरेसा पाऊस न झाल्याने पूर्णा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पूर्णा नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे़ यामुळे शहराला होणारा पाणीपुरवठा तब्बल आठ दिवसांपासून बंद झाला आहे़ त्यामुळे नागरिकांना भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ नगरपालिकेच्या वतीने पूर्णा शहराला पूर्णा नदीपात्रातून पाणीपुरवठा केला जातो़ गतवर्षी पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासली नाही़ उपलब्ध पाणीसाठ्यामुळे शहरातील हातपंपांनाही चांगले पाणी राहिले़ परंतु, यंदाच्या पावसाळ्यात पूर्णा तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली नाही़ त्यामुळे नद्या, पाझर तलाव, बंधारे कोरडेठाक पडले आहेत़ पावसाळ्याचे तीन महिने उलटले तरीही पाऊस म्हणावा तसा पडलाच नाही़ त्यामुळे नगरपालिकेच्या वतीने पूर्णा नदीच्या पात्रातून शहराला पाणीपुरवठा केला जातो़ परंतु, पूर्णा नदीतील पाणीसाठा अत्यल्प राहिल्याने पुर्णेकरांना भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे़ नगरपालिकेने उन्हाळ्यात सिद्धेश्वर धरणातून पाणी घेतले होते़ त्यानंतर पुढील उपाय योजना करणे अपेक्षित होते़ परंतु, याकडे दुर्लक्ष झाले़ आता सिद्धेश्वर व येलदरी धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे़ अशा अवस्थेत पुर्णेकरांना आता पिण्याच्या पाण्यासाठीही भटकंती करण्याची वेळ आली आहे़ (प्रतिनिधी)